प्रतिज्ञापत्रासह तक्रारी आणि पुरावे सादर करण्याचे आयोगाचे आवाहन; मराठी किंवा इंग्रजीत निवेदन देता येणार
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नऊ स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका फुटल्याच्या कथित घटनांचा तपास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली आहे. या प्रकरणांशी निगडित तक्रारी, माहिती किंवा पुरावे असणाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आयोगाकडे निवेदन दाखल करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाने एमपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका अथवा उत्तरतालिका फुटल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी हा आयोग स्थापन केला आहे. या चौकशीच्या अनुषंगाने परीक्षार्थी, विद्यार्थी, संबंधित व्यक्ती तसेच नोंदणीकृत संस्थांना आपल्याकडे असलेली माहिती आयोगापर्यंत पोहोचवता येणार आहे.
निवेदनासाठी प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रे आवश्यक
तक्रार किंवा निवेदन सादर करताना आयोगाने निर्धारित केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या नमुन्याचा वापर करणे आवश्यक आहे. निवेदन मराठी किंवा इंग्रजी भाषेत देता येईल. त्यासोबत नोटरीकृत प्रतिज्ञापत्र जोडणे बंधनकारक आहे.
संबंधितांनी निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती सादर कराव्यात. प्रतिज्ञापत्र, निवेदन आणि संबंधित कागदपत्रांची प्रत आयोगाच्या अधिकृत ई-मेलवरही पाठवावी.
ई-मेल : complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in
आयोगाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक
निवेदने प्रत्यक्ष सादर करण्यासाठी आयोगाचे कार्यालय मुंबईतील वांद्रे पूर्व येथील बीकेसी परिसरात आहे.
कार्यालयाचा पत्ता : अन्न व औषध प्रशासन भवन, दालन क्रमांक २०१, दुसरा मजला, बीकेसी, वांद्रे (पूर्व), मुंबई – ५१.
तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे किंवा अन्य माहितीसाठी ०२२-२०८६७६७७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. निर्धारित मुदतीत आणि विहित स्वरूपात निवेदन सादर करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.
