भाविकांच्या सुविधांसाठी घेतलेल्या जागेच्या व्यवहाराला मंत्रिमंडळाची मंजुरी; २ कोटी ३२ लाखांहून अधिक शुल्काची बचत
मुंबई, दि. ४ : मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात भाविकांसाठी अधिक सुविधा उभारण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या राम मॅन्शन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या खरेदी व्यवहाराला राज्य सरकारने आर्थिक सवलत दिली आहे. या व्यवहारासाठी भरावे लागणारे २ कोटी ३२ लाख ३८ हजार ७०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
मंदिर न्यासाने भाविकांची वाढती गर्दी आणि त्यांना आवश्यक असलेल्या सोयींचा विचार करून मंदिरालगतची ही मालमत्ता खरेदी केली आहे. सुमारे ७०८ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या संस्थेत १३ सदनिका आणि सात व्यावसायिक गाळे आहेत.
९४ कोटींहून अधिक रुपयांचा खरेदी व्यवहार
राम मॅन्शन सहकारी गृहनिर्माण संस्थेतील एकूण २० सदनिका व व्यावसायिक गाळ्यांच्या खरेदीसाठी ९४ कोटी ११ लाख ६५ हजार ५५० रुपयांच्या व्यवहाराला मान्यता देण्यात आली आहे. या खरेदीमुळे मंदिराच्या परिसरातील उपलब्ध जागेचा भाविकांच्या सोयीसाठी उपयोग करता येणार आहे.
सामान्यतः या व्यवहारावर २ कोटी ३२ लाख ३८ हजार ७०० रुपये मुद्रांक शुल्क आकारले गेले असते. मात्र, लोकहिताच्या दृष्टीने हा खर्च माफ करण्यास सरकारने संमती दिली आहे.
भाविकांसाठी विविध सुविधा उभारण्याचे नियोजन
खरेदी केलेल्या जागेचा उपयोग मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थापनासाठी करण्यात येणार आहे. यामध्ये दर्शनाच्या रांगांचे नियोजन, प्रसादालय, स्वयंपाकगृह, यात्रिनिवास आणि मर्यादित वाहनतळ अशा सुविधांचा समावेश आहे.
मंदिर परिसरात भाविकांना अधिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी ही जागा उपयोगी ठरणार आहे. मुद्रांक शुल्क माफीमुळे न्यासावरील आर्थिक भार कमी होऊन उपलब्ध निधीचा वापर भाविकांसाठीच्या सुविधांवर करता येईल.
मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या सुविधा-विस्ताराच्या प्रयत्नांना आर्थिक पाठबळ मिळाले असून, खरेदी केलेल्या मालमत्तेचा भाविकांच्या सोयीसाठी वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

