मुंबई शहर आणि उपनगरातील पात्र विद्यार्थ्यांना आवाहन; नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ हजार रुपयांचा लाभ
मुंबई, दि. ३० : आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. मुंबई शहर व उपनगरातील इतर मागासवर्गीय (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) विद्यार्थ्यांना २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी या योजनांचा लाभ घेता येणार आहे. मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.
केंद्र शासनाच्या ‘पीएम यशस्वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजने’तून इयत्ता नववी आणि दहावीमध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी ४ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
मुलींसाठीही विविध शिष्यवृत्ती योजना
महाडीबीटी २.० पोर्टलवर ओबीसी, एसबीसी आणि व्हीजेएनटी प्रवर्गातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहे. याशिवाय, पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा अधिक असलेल्या इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.
मुंबईतील माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्तीचीही तरतूद आहे. तसेच दारिद्र्यरेषेखालील व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पात्र खासगी विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कासाठी आर्थिक सहाय्य देणारी योजनाही लागू आहे.
अर्ज आणि पडताळणीच्या महत्त्वाच्या तारखा
‘पीएम यशस्वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजने’साठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरून अर्ज करणे आवश्यक आहे. त्यासाठी https://scholarships.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.
अर्जातील त्रुटींची पूर्तता आणि संस्थास्तरावरील अर्जांची पडताळणी १५ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करायची आहे. त्यामुळे अर्जदारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक माहिती व कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांतील शाळांचे मुख्याध्यापक तसेच शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांनी संबंधित योजनांची माहिती पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. अर्ज भरण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे आणि पोर्टलवरील प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यास पात्र लाभार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाहीत.

