मिरवणुका, ध्वनिवर्धकांचा वापर आणि फटाके फोडण्यावरही बंदी; विवाह, अंत्यविधी आणि नियमित कार्यालयीन कामकाजाला सूट
मुंबई, दि. २३ : शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यासह मिरवणुका काढणे, जमावात ध्वनिवर्धक किंवा सांगीतिक बँडचा वापर करणे आणि फटाके फोडणे यांवर निर्बंध असतील.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी हा आदेश जारी केला आहे. मात्र, या निर्बंधांमधून दैनंदिन जीवनातील अनेक नियमित आणि कायदेशीर उपक्रमांना वगळण्यात आले आहे.
कोणत्या कार्यक्रमांना सूट?
विवाह समारंभ, विवाहाशी संबंधित अन्य विधी आणि अंत्यविधी यांना जमावबंदी आदेशातून वगळण्यात आले आहे. कंपन्या, सहकारी संस्था, इतर संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमधील कार्यक्रम आणि सामाजिक मेळावे यांनाही या आदेशातून सूट देण्यात आली आहे. संबंधित संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांनाही हे निर्बंध लागू होणार नाहीत.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि सार्वजनिक मनोरंजनाची इतर ठिकाणे तसेच न्यायालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि अन्य शैक्षणिक संस्थांमधील नियमित कामकाजही या आदेशाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. कंपन्या, कारखाने, दुकाने आणि अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार व व्यवसायाच्या अनुषंगाने होणाऱ्या जमावांनाही सूट देण्यात आली आहे.
परवानगी असलेल्या मोर्चांनाही निर्बंधांतून वगळले
शांततेच्या मार्गाने काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळाली असल्यास, अशा मोर्चाला जमावबंदी आदेशातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे मोर्चा काढण्यापूर्वी आवश्यक पोलिसांची परवानगी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पोलीस उपआयुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी या आदेशाद्वारे निर्बंध आणि त्यातून वगळलेल्या बाबी स्पष्ट केल्या आहेत. मुंबईकरांनी लागू आदेशाचे पालन करताना सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे.

