सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उपक्रमाला शासनाची प्रशासकीय मान्यता
मुंबई, दि. २२ : पु. ल. देशपांडे यांच्या जपून ठेवलेल्या पत्रव्यवहाराचा समृद्ध ठेवा आता पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने या संग्रहाचे संपादन करून पुस्तक प्रकाशित करण्यास प्रशासकीय मान्यता दिली असून, त्यासाठी १० लाख रुपयांपर्यंतच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पुढे आला आहे.
पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याइतकेच त्यांचे विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी असलेले संबंध आणि संवादही मराठी सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात. त्यांच्या पत्रसंग्रहातून साहित्य, संगीत, रंगभूमी, चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक समकालीन व्यक्तिमत्त्वांशी असलेल्या संबंधांची माहिती समोर येते.
या संग्रहात भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, पं. रविशंकर, ग. दि. माडगूळकर, वि. वा. करंदीकर, जयवंत दळवी, विजय मर्चंट, बाबा आमटे, स्वामी विज्ञानानंद, पांडुरंगशास्त्री आठवले आणि दया पवार यांच्यासह विविध मान्यवरांशी संबंधित पत्रव्यवहाराचा समावेश आहे. त्यामुळे या पत्रांकडे केवळ खासगी पत्रव्यवहार म्हणून न पाहता त्या काळातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरणाचा संदर्भ देणारा ऐतिहासिक स्रोत म्हणूनही पाहता येते.
सुनीताबाईंनी जपला पत्रांचा ठेवा
पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाईंनी अनेक मान्यवरांकडून आलेली पत्रे जतन करून ठेवली होती. त्याचबरोबर पु. ल. देशपांडे यांनी विविध व्यक्तींना लिहिलेल्या पत्रांच्या प्रतीही सुनीताबाई आणि कुटुंबीयांच्या संग्रहात उपलब्ध आहेत.
या साहित्यिक ठेव्याचे व्यवस्थित संकलन, संपादन आणि प्रकाशन करण्याचा विषय काही काळापासून शासनाच्या विचाराधीन होता. आता सांस्कृतिक कार्य विभागाच्या निर्णयामुळे या कामाला अधिकृत प्रशासकीय आधार मिळाला आहे.
संशोधनासाठीही उपयुक्त ठरणार संग्रह
पु. ल. देशपांडे यांच्या पत्रांमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, साहित्यिक प्रवासाचा तसेच समकालीन साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्राशी असलेल्या संबंधांचा वेगळा पैलू अभ्यासता येणार आहे. त्यामुळे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर साहित्यप्रेमींसोबतच संशोधक आणि अभ्यासकांसाठीही हा संग्रह महत्त्वाचा संदर्भ ठरू शकतो.
पु. ल. देशपांडे यांच्या लेखनातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर उमटलेला ठसा व्यापक आहे. त्यांच्या पत्रांमधील संवाद पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध झाल्यास त्यांच्या काळातील अनेक व्यक्ती, घटना आणि सांस्कृतिक प्रवाह यांचा अभ्यास करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा दस्तऐवजी स्रोत उपलब्ध होईल.

