गणेशोत्सवातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय; यापूर्वीच्या आंदोलनातील वाहतूक कोंडी आणि गर्दीचाही दिला संदर्भ
मुंबई, दि. १३ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर १९ सप्टेंबर रोजी आमरण उपोषण करण्यासाठी मागितलेली परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली आहे. आंदोलनासाठी निश्चित केलेल्या अटींचे पालन करण्याची हमी देण्यात आली असतानाही, दक्षिण मुंबईतील दैनंदिन व्यवहार, वाहतूक, आरोग्यसेवा आणि सार्वजनिक सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या नियोजनाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी यासंदर्भात दिलेल्या पत्रातून पोलिसांची भूमिका स्पष्ट केली आहे. दक्षिण मुंबईतील शाळा, रुग्णालये, व्यावसायिक आस्थापना, न्यायालयीन कामकाज आणि सार्वजनिक वाहतूक यांसारख्या नियमित सेवा मोठ्या गर्दीमुळे प्रभावित होऊ शकतात. परिणामी सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणासाठी पोलिसांकडे परवानगी मागताना आंदोलनादरम्यान लागू करण्यात येणाऱ्या अटी-शर्तींचे पालन करण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी त्यांनी पोलिसांना हमीपत्रही दिले होते. मात्र, उपलब्ध परिस्थितीचा विचार करून पोलिसांनी परवानगी देण्यास नकार दिला आहे.
मागील आंदोलनाचा पोलिसांकडून संदर्भ
मुंबईत यापूर्वी झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने मराठा आंदोलक शहरात दाखल झाले होते. या गर्दीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला होता. सीएसएमटी परिसर तसेच महानगरपालिका मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले होते.
मागील आंदोलनासाठी पोलिसांनी काही अटींसह परवानगी दिली होती. आझाद मैदानावर पाच हजार आंदोलक उपस्थित राहतील, अशी मर्यादा त्यावेळी घालण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात या संख्येपेक्षा अधिक आंदोलक जमा झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. याच अनुभवाचा आधार घेत यावेळी परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते.
मोठ्या प्रमाणातील गर्दीमुळे वाहतूक नियंत्रण, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेचे व्यवस्थापन यांसमोर पोलिसांसमोर आव्हान निर्माण होऊ शकते, अशी चिंता या निर्णयामागे असल्याचे स्पष्ट होत आहे.
गणेशोत्सवामुळे सुरक्षा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण
यंदा मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आधीच मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त आणि सार्वजनिक सुरक्षेची तयारी करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात विविध भागांत भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतूक आणि गर्दीचे नियोजन हे पोलिसांसाठी महत्त्वाचे आव्हान असते.
मुंबई शहर सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने गणेशोत्सव काळात संभाव्य अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. अशा वेळी स्वतंत्र आंदोलनामुळे मोठ्या संख्येने नागरिक एकाच ठिकाणी जमा झाल्यास विद्यमान सुरक्षा नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करू नये, याबाबत पोलिसांकडून स्वतंत्र नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील या निर्णयावर काय भूमिका घेतात आणि पुढील आंदोलनाची दिशा काय ठरवतात, याकडे लक्ष लागले आहे.
