मुंबई उपनगरीय रेल्वेच्या विस्तारासाठी १८ हजार कोटींची कामे सुरू; २३८ वातानुकूलित लोकल रेकची निर्मिती होणार
मुंबई, दि. ३ : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचा वाढता ताण लक्षात घेऊन लोकल सेवेत मोठी वाढ करण्याची तयारी रेल्वेने सुरू केली आहे. सध्या दररोज सुमारे ३ हजार २०० लोकल फेऱ्या होत असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या पायाभूत सुविधांच्या मदतीने २०३० पर्यंत ही संख्या ३ हजार ५०० वर नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढविण्यासाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांची विविध कामे सुरू असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रवाशांना दिलासा देणाऱ्या मुंबई-सावंतवाडी दैनंदिन एक्स्प्रेस सेवेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १८ वर झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडी रवाना करण्यात आली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल हे दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, महापौर रितू तावडे तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुंबईतील स्थानकांची क्षमता वाढविण्यावर भर
मुंबई रेल्वे जाळ्यावरील प्रवाशांचा वाढता भार हाताळण्यासाठी स्थानकांच्या पायाभूत सुविधांमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल केले जात आहेत. जोगेश्वरी येथे पाच नवीन फलाट आणि दोन पिट लाइन उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दादर येथे आणखी एका फलाटाची भर पडणार असून, वसई रोड परिसरात सहा फलाट, तीन पिट लाइन आणि पाच स्टेबलिंग लाइन विकसित केल्या जात आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन फलाट आणि दोन पिट लाइन उभारण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर विविध स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढवून १५ डब्यांच्या गाड्या हाताळण्याची क्षमता निर्माण केली जाणार आहे. या कामांमुळे भविष्यातील उपनगरीय रेल्वे सेवांचा विस्तार करण्यास मदत होणार आहे.
प्रवाशांची संख्या वाढत असताना उत्सवांच्या काळातील गर्दी व्यवस्थापित करण्यासाठी यंदा ३५० विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. प्रवाशांची गरज वाढल्यास आणखी २० विशेष गाड्या सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने ठेवली आहे.
२३८ वातानुकूलित लोकल रेकची निर्मिती
उपनगरीय प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर रेल्वे बोर्डाने २३८ वातानुकूलित लोकल रेक तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
या रेकच्या निर्मितीत मॉडर्न कोच फॅक्टरी आणि रेल कोच फॅक्टरी यांच्यात समन्वय राहणार आहे. नव्या वातानुकूलित लोकलची पहिली गाडी २०२७ मध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा असून, २०३० पर्यंत सर्व २३८ रेकची निर्मिती आणि त्यांचा पुरवठा पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक मार्ग
राज्यातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्यासाठी समृद्धी महामार्गालगत पूर्व आणि पश्चिम दिशेने समर्पित मालवाहतूक मार्ग विकसित करण्याच्या प्रस्तावावरही काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार या रेल्वेमार्गांचे आरेखन करण्यात येणार आहे.
या मार्गांमुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक परिसरातील रेल्वे संपर्काला बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतुकीची क्षमता वाढल्याने औद्योगिक आणि आर्थिक हालचालींनाही त्याचा फायदा होऊ शकतो.
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामालाही वेग
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील कामाचीही सद्यस्थिती रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केली. प्रकल्पात आतापर्यंत सुमारे ४५५ किलोमीटर लांबीचे पिअर्स आणि ३६५ किलोमीटरचे व्हायाडक्ट पूर्ण झाले आहेत.
वांद्रे-कुर्ला संकुल ते ठाणे या भूमिगत मार्गाचा महत्त्वाचा भाग समुद्राखालून जाणार आहे. भारतातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याचा समावेश असलेल्या या कामासाठी विक्रोळी आणि घणसोली येथून टनेल बोअरिंग मशीनच्या साहाय्याने बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. मुंबई-पुणे बुलेट ट्रेन कॉरिडॉरचाही महाराष्ट्राच्या भविष्यातील दळणवळण व्यवस्थेच्या दृष्टीने विचार केला जात असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
कोकणासाठी नवी दैनंदिन रेल्वे सेवा
मुंबई आणि सावंतवाडी रोड यांच्यात मध्य रेल्वेकडून नवीन दैनंदिन एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. उद्घाटनासाठीची विशेष गाडी क्रमांक ०१००१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री २ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे.
या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबे देण्यात आले आहेत.
गाडीच्या संरचनेत एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, चार शयनयान आणि चार सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. याशिवाय द्वितीय आसन श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅनचा समावेश असेल.
मुंबईतील लोकल सेवेत प्रस्तावित वाढ, स्थानकांच्या विस्ताराची कामे आणि वातानुकूलित लोकलच्या निर्मितीसोबतच कोकणासाठी सुरू झालेली दैनंदिन एक्स्प्रेस सेवा या रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाच्या घडामोडी ठरणार आहेत. वाढती प्रवासी संख्या, सुरक्षितता आणि भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन या प्रकल्पांना गती देण्यावर रेल्वेचा भर आहे.
