चौपदरीकरणाचे काम सुरू असताना वाहतुकीच्या अपेक्षित सुविधा अद्याप पूर्ण नाहीत; काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिकांना टोलमध्ये सवलतीचीही मागणी
मुंबई, दि. ३ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत खारपाडा येथील टोल वसुली स्थगित करावी, अशी मागणी खुद्द सरकारात असलेल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. महामार्गाचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत अडचणी असून, आवश्यक सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर खारपाडा टोल स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सध्या सुरू आहे. महामार्गावरील रस्ता दुभाजक, उड्डाणपूल आणि साईड पट्टी यांसह विविध कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे काही भागांत अद्याप एकेरी वाहतूक सुरू आहे.
वाहतुकीसाठी अपेक्षित सुविधा पूर्ण झालेल्या नसताना टोल आकारणी सुरू ठेवण्याबाबत कोकणातील नागरिकांकडून व्यक्त होत असलेल्या भावनेचा विचार करून हा टोल स्थगित करावा, अशी भूमिका आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
यासंदर्भात तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी केली. मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा येथील टोल वसुली थांबवण्याचा निर्णय घ्यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
स्थानिकांना टोलमध्ये सवलतीची मागणी
महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरही स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांच्या हिताचा विचार करावा, अशी भूमिका तटकरे यांनी मांडली आहे. भविष्यात स्थानिक नागरिक तसेच व्यावसायिकांना टोलमध्ये सवलत देण्याबाबत विचार करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होतील. मात्र, तोपर्यंत खारपाडा येथील टोल वसुली स्थगित करण्याच्या मागणीवर शासनाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे आता कोकणातील नागरिकांचे लक्ष आहे.
