३,४०० गणना प्रपत्रे आढळली; प्रकरणाच्या चौकशीसाठी पनवेल महापालिकेच्या उपायुक्तांची नियुक्ती
रायगड, दि. २८ : मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान खारघरमध्ये निवडणूक आयोगाच्या संवेदनशील कागदपत्रांच्या हाताळणीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सेक्टर १९ येथील झेरॉक्स केंद्रावर मतदारांच्या गणना प्रपत्रांच्या अनधिकृत प्रती काढल्या जात असल्याची तक्रार झाल्यानंतर केलेल्या तपासणीत ३,४०० प्रपत्रे आढळली. या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित पाच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
ही घटना १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ अंतर्गत सुरू असलेल्या प्रक्रियेदरम्यान घडली. मतदारांची माहिती असलेली गणना प्रपत्रे ही निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाची कागदपत्रे असल्याने त्यांची अनधिकृत प्रत काढण्याच्या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
झेरॉक्स केंद्रावर तपासणी, ३,४०० प्रपत्रे जप्त
२७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खारघर सेक्टर १९ मधील एका झेरॉक्स केंद्रावर ही प्रपत्रे अनधिकृतरीत्या छायांकित केली जात असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद दादा भोईर यांनी याबाबत तक्रार केली होती.
तक्रार मिळताच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक तपासणी केली. त्यावेळी मुर्बी गाव, खारघर येथील रहिवासी सूरज पाटील हे संबंधित प्रपत्रांच्या प्रती काढत असल्याचे आढळले.
तपासणीदरम्यान एकूण ३,४०० गणना प्रपत्रे मिळाली. ही कागदपत्रे ११ मतदान केंद्रांशी संबंधित होती. यातील पाच मतदान केंद्रांची १०० पेक्षा अधिक प्रपत्रे होती, तर उर्वरित सहा मतदान केंद्रांमधील प्रत्येकी एक प्रपत्र आढळले.
सूरज पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा
निवडणूक नियमांनुसार संबंधित गणना प्रपत्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात असणे अपेक्षित आहे. अशी कागदपत्रे परवानगीशिवाय ताब्यात ठेवणे तसेच त्यांची प्रत तयार करण्याच्या प्रकाराची कायदेशीर दखल घेण्यात आली आहे.
सूरज पाटील यांच्याविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात प्रथम खबर अहवाल क्रमांक ०४०९/२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील विविध तरतुदींनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पाच बीएलओंवर कारवाई
या प्रकरणातील कागदपत्रे संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या दप्तरातून बाहेर कशी गेली, याचीही चौकशी केली जात आहे. ज्या पाच बीएलओंच्या ताब्यातील कागदपत्रे अनधिकृतरीत्या बाहेर गेल्याचे समोर आले, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
नियुक्ती प्राधिकारी तथा पनवेल महानगरपालिका आयुक्तांना भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३२ नुसार या पाचही बीएलओंना तत्काळ निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चौकशीसाठी स्वतंत्र अधिकारी
प्रकरणाची व्याप्ती आणि कागदपत्रांची संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल चौकशी करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी क्रमांक ३ नानासाहेब कामठे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या प्रकरणाची माहिती देताना तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पोलिसांकडूनही पुढील तपास वेगाने सुरू असून, अनधिकृतरीत्या प्रपत्रे बाहेर जाण्यामागील नेमकी प्रक्रिया आणि त्यामध्ये कोणाची भूमिका होती, याचा तपास होणे अपेक्षित आहे.
मतदारयादी पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आता संबंधित कागदपत्रांच्या हाताळणीबाबत अधिक काटेकोरपणे तपास केला जात आहे.

