४८८ उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर कारवाई; नव्याने अर्ज किंवा परीक्षा शुल्काची गरज नाही
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या भरती प्रक्रियेला गैरप्रकाराच्या तक्रारींमुळे मोठा धक्का बसला आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेबाबत प्राप्त तक्रारींच्या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच आधीच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्यानंतर आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या पदांसाठी नव्याने फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.
आयोगाने औषध निरीक्षक पदासाठी २९ जुलै २०२५ रोजी जाहिरात क्रमांक ११६/२०२५ प्रसिद्ध केली होती. त्यानंतर २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल १२ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात आला होता.
निकालानंतर एकूण ५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ४८८ उमेदवारांच्या मुलाखती १ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या. मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २२ जुलै रोजी पात्र ठरलेल्या ४८५ आणि अपात्र ठरलेल्या तीन, अशा एकूण ४८८ उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.
प्रश्नपत्रिका आधी मिळाल्याच्या तक्रारी
दरम्यान, चाळणी परीक्षेतील कथित गैरप्रकाराबाबत २२ ते २६ जुलैदरम्यान आयोगाकडे उमेदवार तसेच लोकप्रतिनिधींकडून ई-मेलद्वारे तक्रारी दाखल झाल्या. परीक्षेच्या काही दिवस आधी, म्हणजे २० मार्च रोजी, काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका अथवा प्रश्न मिळाल्याचा दावा या तक्रारींमध्ये करण्यात आला होता. हे प्रश्न सोशल मीडिया किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रसारित झाल्याचेही तक्रारदारांनी नमूद केले होते.
तक्रारींचे स्वरूप आणि परीक्षेच्या विश्वासार्हतेशी संबंधित गंभीर बाब लक्षात घेऊन आयोगाने २७ जुलै रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तक्रार दाखल केली.
त्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेने प्राथमिक चौकशी केली. चौकशीनंतर आयोगाला सादर करण्यात आलेल्या अहवालात एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे तसेच त्यातून त्या उमेदवाराला फायदा झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याचे नमूद करण्यात आले.
फेरपरीक्षा; उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही
परीक्षेच्या निष्पक्षतेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आयोगाने भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेची गोपनीयता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासोबतच उमेदवारांचा आयोगावरील विश्वास कायम राहावा, हा निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
आता औषध निरीक्षक पदासाठी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेसाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही. फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्कही घेतले जाणार नाही. फेरपरीक्षेची तारीख, परीक्षा केंद्रे आणि त्यासंबंधीची इतर माहिती आयोगाकडून स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केली जाणार आहे.
या निर्णयामुळे आधीच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार असली, तरी भरती प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे उमेदवारांच्या प्रतीक्षेत वाढ झाली आहे. आता फेरपरीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडण्याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

