आतापर्यंत १ लाख ६५ हजार ८०० चालकांना प्रशिक्षण; इच्छुकांना आणखी चार महिन्यांची संधी
मुंबई, दि. २५ : प्रवाशांशी दैनंदिन व्यवहार करताना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिले जाणारे मराठी भाषेचे प्रशिक्षण पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे १ लाख ६५ हजार ८०० चालकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, उर्वरित इच्छुक चालकांसाठी प्रशिक्षण केंद्रे आणि कार्यशाळा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
परिवहन विभागाने सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून राबविलेल्या १०५ दिवसांच्या विशेष उपक्रमाला चालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सरनाईक यांनी सांगितले. महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि अस्मिता यांचा आदर राखत प्रवाशांशी व्यवहार करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इच्छुक चालकांसाठी प्रशिक्षणाची सुविधा कायम
ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना अद्याप मराठीचे प्रशिक्षण घेता आलेले नाही, त्यांच्यासाठी कार्यशाळा सुरूच ठेवण्यात येणार आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून या कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे.
मुंबई, ठाणे, भिवंडी, नालासोपारा, वसई-विरार आणि नवी मुंबई या भागांतील प्रशिक्षण केंद्रांची माहिती संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आली आहे. चालकांना जवळचे प्रशिक्षण केंद्र शोधता यावे यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या माध्यमातून स्वतंत्र संपर्क क्रमांकही लवकरच जाहीर केला जाणार आहे.
या उपक्रमाला कामगार नेते शशांक राव यांनीही सहकार्य दर्शविले असून, मराठी शिकण्यास इच्छुक रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यास त्यांनी सहमती दिली आहे.
मराठी शिकण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी
मराठी भाषा शिकण्यासाठी चालकांना पुरेसा अवधी देण्याची भूमिका परिवहन विभागाने घेतली आहे. सुरुवातीला एक महिन्याची मुदत देण्यात येईल. त्यानंतर गरज भासल्यास आणखी तीन महिन्यांचा कालावधी उपलब्ध करून दिला जाईल. म्हणजेच चालकांना मराठी शिकण्यासाठी एकूण चार महिन्यांची संधी मिळणार आहे.
या प्रक्रियेदरम्यान संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार बॅज निलंबित करण्याची कारवाई होऊ शकते. मात्र, दिलेल्या तीन महिन्यांच्या अतिरिक्त कालावधीत बॅज रद्द केला जाणार नाही. त्यानंतरही जाणीवपूर्वक मराठी भाषा शिकण्यास नकार दिल्यास कायद्यानुसार बॅज रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई
मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविण्यात येत असल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले. मात्र, परिवहन विभागाच्या निर्देशांचे उल्लंघन करून किंवा कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कोणी कारवाई करत असल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’ पुढेही सुरू ठेवण्याचे सरकारचे धोरण असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
मुंबई आणि ठाणे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडविण्याचा काही समाजकंटकांकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप करत सरनाईक यांनी नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. रिक्षा-टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी आणि नेत्यांशी शासनाचा संवाद सुरू असून, त्यांच्या सूचनांचाही विचार केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, “रोजगार हिरावून घेणारे नव्हे, रोजगार देणारे शासन; अफवांवर विश्वास ठेवू नका”, अशी भूमिका मांडत सरनाईक यांनी या विषयाकडे संघर्षाच्या दृष्टिकोनातून न पाहता संवाद आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर भर दिला.
मराठी भाषेचे प्रशिक्षण, चालकांना मिळणारी मुदत आणि कायदेशीर कारवाई याबाबतची प्रक्रिया स्पष्ट केल्याने आगामी काळात या उपक्रमाची अंमलबजावणी अधिक नियोजित पद्धतीने होण्याची अपेक्षा आहे. सरकार आणि रिक्षा-टॅक्सी चालकांच्या संघटनांमधील समन्वयातून हा उपक्रम पुढे नेण्याचे संकेत परिवहन विभागाने दिले आहेत.
