चाकण एमआयडीसीतील प्रश्नांवर तातडीने हालचाली; रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
पुणे, दि. १४ : चाकण औद्योगिक वसाहतीतील वाढत्या वाहतूक कोंडीपासून रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांपर्यंतच्या अडचणी आता प्रशासनाच्या अजेंड्यावर प्राधान्याने घेण्यात येणार आहेत. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्योजक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.
चाकण औद्योगिक परिसरातील समस्यांबाबत उद्योजकांकडून सातत्याने मांडल्या जाणाऱ्या अडचणींची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रतिनिधींशी संवाद साधला. चाकण नागरी कृती समिती आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी धनंजय शेडबाळे यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेत त्यांनी परिसरातील विविध प्रश्नांची माहिती घेतली.
उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या चाकण परिसरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाच्या विविध यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना एकत्रितपणे उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
चाकण एमआयडीसीतील परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले.
यामध्ये एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, खेडचे प्रांत अधिकारी अनिल दौंडे आणि चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचा समावेश आहे.
चाकणमधील औद्योगिक वाहतूक लक्षात घेता रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेतील अडचणींचा थेट परिणाम उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर होतो. त्यामुळे संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने प्रश्न हाताळावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
उद्योजकांशी थेट संवादावर भर
उपमुख्यमंत्री पवार यांनी उद्योजकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. प्रशासन आणि उद्योग प्रतिनिधी यांच्यात थेट संवाद राहिल्यास स्थानिक पातळीवरील प्रश्न अधिक वेगाने सोडविता येतील, या भूमिकेतून पुढील बैठक आयोजित केली जाणार आहे.
या बैठकीत चाकण परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी तसेच अन्य पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आवश्यक त्या उपाययोजनांना गती देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
चाकण हा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा औद्योगिक परिसर असल्याने येथील मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे उद्योग क्षेत्राचेही लक्ष असते. प्रशासनाकडून आता या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याने आगामी बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे.
*संग्रहित छायाचित्र

