साताऱ्यातील यंत्रणांना सज्ज राहण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना
सातारा, दि. ३ : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढला असून, संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी धरणांतील विसर्गाचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. अतिरिक्त पाणी विनाकारण समुद्रात वाहून न जाता दुष्काळी तालुक्यांतील तलाव, बंधारे आणि जलस्रोत भरावेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील पुरपरिस्थिती, धरणांतील पाणीसाठा आणि आपत्कालीन उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. धरणांमधून होणारा विसर्ग असा असावा की, त्यातून अनावश्यक पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पूर्वनियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “पावसाचा अतिरिक्त जोर असल्यास आणि नद्यांना पूर आल्यास, ते पाणी वाया जाऊ न देता कालवे आणि उपसा सिंचन योजनांद्वारे दुष्काळी भागातील तलाव आणि बंधाऱ्यांमध्ये सोडावे, जेणेकरून त्या भागातील पाण्याचा प्रश्न सुटेल.”
दुष्काळी भागातील जलस्रोत भरण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी सतर्क राहून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रतिसाद देण्याची तयारी ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत पाटण तालुक्यातील दरडप्रवण भागांचाही विशेष आढावा घेण्यात आला. या परिसरातील नागरिकांच्या पुनर्वसनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. ज्या गावांसाठी पुनर्वसनाची योग्य जागा अद्याप निश्चित झालेली नाही, त्या ठिकाणी क्षेत्रीय पाहणी करून पर्यायी जागांचा शोध घेण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांमध्ये समन्वय अधिक प्रभावी ठेवण्यावर बैठकीत भर देण्यात आला. पावसाच्या परिस्थितीनुसार धरण व्यवस्थापन, पूरनियंत्रण आणि दुष्काळी भागांसाठी जलसाठ्याचे नियोजन यांचा समतोल साधून काम करण्याची आवश्यकता पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधोरेखित केली.

