देश-विदेशातील मंडळांनाही सहभागाची संधी
मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य शासनाने गतवर्षी ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा दिल्यानंतर यंदा या उपक्रमाचा आणखी व्यापक विस्तार करण्यात आला आहे. राज्य महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा विस्तार देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच देशातील आणि जगभरातील विविध ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनाही या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक उपक्रम राबविणाऱ्या मंडळांच्या कार्याची शासनाकडून दखल घेतली जाणार असून, उत्कृष्ट उपक्रमांना आकर्षक आणि भरघोस पुरस्कारांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे. गणेशोत्सवाला सामाजिक परिवर्तन, सांस्कृतिक जतन आणि लोकसहभागाचे प्रभावी व्यासपीठ म्हणून अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त २३ जुलै रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार असून, यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळपाटील, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाद्वारे यंदाच्या महागणेशोत्सव उपक्रमांचा अधिकृत शुभारंभ देखील करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि विधायक स्वरूपात साजरा करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेत सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास, उत्सव आणि सामाजिक भान, आर्थिक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, विधायक उपक्रमांचे नियोजन, नेतृत्व विकास अशा विविध विषयांवर तज्ज्ञ व्याख्याते सविस्तर मार्गदर्शन करतील. तसेच लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या केशवजी नाईक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मंडळाच्या शतकोत्तर प्रवासाचा प्रेरणादायी आढावा सादर करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या मते, सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून समाजप्रबोधन, लोकसहभाग, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक जतनाचे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून मराठी भाषा, मराठी संस्कृती, राष्ट्रीय एकात्मता आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानातील वैश्विक कल्याणाच्या संकल्पनेचा प्रसार करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. तसेच मूल्याधारित सांस्कृतिक देवाणघेवाण, सामाजिक उत्तरदायित्व आणि विधायक उपक्रमांना चालना देण्याचे उद्दिष्टही या उपक्रमामागे आहे.
ही प्रशिक्षण कार्यशाळा पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत आयोजित करण्यात आली असून, देश-विदेशातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभाग घेता यावा यासाठी संपूर्ण कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून अकादमीच्या यूट्यूब वाहिनीवर थेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्याबाहेरील तसेच परदेशातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या सामाजिक, सांस्कृतिक व विधायक उपक्रमांचे सादरीकरण करावे, असे आवाहन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांनी केले आहे.
राज्य महोत्सवाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवाला अधिक व्यापक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, सामाजिक ऐक्य वृद्धिंगत व्हावे आणि विधायक परंपरांचा गौरव व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांस्कृतिक कार्य विभागाने स्पष्ट केले आहे.
