“अॅक्युपंक्चर उपचार शिक्षणाच्या विस्तारासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘अॅक्युकॉन २०२६’ राष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही; उपचार पद्धतीच्या शैक्षणिक मान्यतेसाठी शासन कटिबद्ध
नागपूर, दि. ११ : अॅक्युपंक्चर ही प्रभावी, सर्वसमावेशक आणि अनुभवाधारित उपचार पद्धती असून, या माध्यमातून अनेक रुग्णांना विविध व्याधींमधून दिलासा मिळत आहे. या उपचार पद्धतीचा अधिक व्यापक प्रसार व्हावा, तिच्या शैक्षणिक संधी वाढाव्यात आणि या ज्ञानशाखेला अधिक बळकटी मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून शासन स्तरावर कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन अॅक्युपंक्चर – अॅक्युकॉन २०२६’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अॅक्युपंक्चरचे डॉ. रूमी बेरामजी, इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अॅक्युपंक्चरचे अध्यक्ष डॉ. रमण कपूर, डॉ. नारायण नवले, डॉ. प्रदीप गुहा यांच्यासह देशभरातील अॅक्युपंक्चर क्षेत्रातील तज्ज्ञ, वैद्यकीय व्यावसायिक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीतून असंख्य रूग्णांना आपल्या व्याधीपासून मुक्त होण्यास मदत झाली आहे. तेवीस-चोवीस वर्षांपूर्वी मी स्वतः पाठदुखीने त्रस्त असताना या उपचार पद्धतीने मला तंदुरुस्त होता आले. या ज्ञानशाखेच्या विस्तारासाठी व याचे शैक्षणिक मार्ग वृद्धिंगत व्हावेत, या दृष्टीने महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून शासकीय पातळीवर कोठेही कमतरता पडणार नाही.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “सिईंग इज बिलिव्हींग अर्थात आपण प्रत्यक्ष जे डोळ्याने पाहतो, त्यावर विश्वास दृढ करतो. अॅक्युपंक्चर उपचार पद्धती ही अशीच अनुभूतीची उपचार पद्धती आहे. या सर्वसमावेशक उपचार पद्धती अंतर्गत आपण ही उपचार पद्धती महत्त्वाची मानली आहे. या क्षेत्रापुढे असलेल्या अडचणींची मला जाणीव असून आम्ही शासनाच्या वतीने पूर्ण क्षमतेने या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू.”
या परिषदेत अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि व्यावसायिक विकासावर विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. उपचार पद्धतीचे वैज्ञानिक संशोधन, आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेशी समन्वय, प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि रुग्णांना सुरक्षित व परिणामकारक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अॅक्युपंक्चरचे डॉ. रूमी बेरामजी म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ज्ञानशाखेला, उपचार पद्धतीला प्रतिष्ठा व शैक्षणिक मान्यता देण्यात दिलेले योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. वेळोवेळी त्यांनी आमची भूमिका समजून घेत शासनस्तरावर असलेल्या अडचणी दूर केल्या असून त्यांच्या सहकार्यानेच महाराष्ट्रात ४ हजार ५०० पेक्षा अधिक नोंदणीकृत तज्ज्ञ अक्युप्रेशरची सेवा देत आहेत. यात साठ टक्के संख्या ही महिलांची असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”
परिषदेत डॉ. रमण कपूर यांनीही आपल्या मनोगतात अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीच्या विकासासाठी शासनाने दिलेल्या सहकार्याचे कौतुक केले. त्यांनी या क्षेत्रातील शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासाला गती देण्यासाठी शासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले.
राष्ट्रीय स्तरावरील या परिषदेमुळे अॅक्युपंक्चर क्षेत्रातील संशोधन, शिक्षण, कौशल्य विकास आणि उपचार सेवांच्या गुणवत्तेला नवे बळ मिळणार असून, रुग्णांना अधिक परिणामकारक आणि वैज्ञानिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी विविध स्तरांवर समन्वय वाढण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
