शैक्षणिक, कौशल्य विकास आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना
मुंबई, दि. ३ : जैन समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी अधिक सक्षम सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यातील मुंबई, नवी मुंबई, पुणे यांसह एकूण सात ठिकाणी वसतिगृहे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या संचालक मंडळाच्या चौथ्या बैठकीत घेण्यात आला. महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडली.
बैठकीत जैन समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या विविध योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, रोजगाराभिमुख प्रशिक्षण वाढविणे आणि समाजातील लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ पोहोचविण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले.
सात शहरांत विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्याचा निर्णय
राज्यातील विविध भागांतून विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी आलेल्या मागण्यांचा विचार करून संचालक मंडळाने मुंबई, नवी मुंबई, पुणे यांसह राज्यातील एकूण सात ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहे उभारण्यास मान्यता दिली. या निर्णयामुळे उच्च शिक्षणासाठी स्थलांतर करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि परवडणारी निवास व्यवस्था उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
कर्ज व व्याज परतावा योजनांना सुधारित स्वरूप
बैठकीत जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजना आणि व्याज परतावा योजनांच्या सुधारित प्रारूपासही मान्यता देण्यात आली. समाजातील युवक, महिला, उद्योजक आणि स्वयंरोजगार इच्छुक लाभार्थ्यांना अधिक प्रभावी आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी योजनांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘विहारधाम निर्माण’ आणि ‘पाठशाळा आधुनिकीकरण’ योजनांवर भर
बैठकीत ‘विहारधाम निर्माण योजना’ तसेच ‘पाठशाळा आधुनिकीकरण व सक्षमीकरण योजना’ राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. याशिवाय राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त महामंडळाकडून अधिक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा आढावाही घेण्यात आला.
जैन युवकांसाठी कौशल्य विकास आणि रोजगार विशेष अभियान
कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने जैन युवक-युवतींसाठी विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण अभियान राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासह विविध रोजगाराभिमुख योजनांचा लाभ अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच महिला व बाल विकास विभागाच्या सहकार्याने महिला बचत गटांसाठी विविध आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

‘मराठी जैन साहित्य विश्वकोष’ निर्मितीला गती
जैन समाजाचा इतिहास, संस्कृती, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचे व्यापक दस्तावेजीकरण करण्यासाठी ‘मराठी जैन साहित्य विश्वकोष’ निर्मितीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला.
दिल्लीत विशेष बैठकीचे नियोजन
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार महामंडळाच्या विविध योजनांमध्ये जैन समाजाचा अधिकाधिक सहभाग वाढावा तसेच योजनांची माहिती समाजातील प्रमुख व्यक्ती आणि संस्थांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी यासाठी नवी दिल्ली येथे विशेष बैठक आयोजित करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
महामंडळासाठी ₹१०० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका
महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त महामंडळाकडून जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी ₹१०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी नवी दिल्ली येथे झालेल्या सामंजस्य करारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल समन्वयक संदीप भंडारी यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. उपस्थित सर्व सदस्यांनी हा ठराव एकमताने मंजूर करून अध्यक्षांच्या कार्याचे कौतुक केले.
वरिष्ठ अधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती
या बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव माधवी खोडे-चवरे, व्यवस्थापकीय संचालक मेघना शिंदे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रम व्यवस्थापक गौरी दोंदे, वित्त विभागाच्या कार्यासन अधिकारी रचना तळेकर, कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माळी, समन्वयक संदीप भंडारी, तसेच महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील, सुनील पाटणी, विकास अच्छा, अमित जैन, दर्शना जैन, विश्वजीत कोल्हापुरे आणि प्रशांत गौडाजे उपस्थित होते.
राज्यातील जैन समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि कौशल्य विकासाला अधिक बळ देण्यासाठी शासन विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देत असून, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीसारखे निर्णय उच्च शिक्षणाच्या संधी अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत.
