महापौर आणि आयुक्त यांनी बालकांना पाजले पोलिओ डोस
नवी मुंबई, दि. २९ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राबविलेल्या विशेष मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी सुमारे ८५ टक्के लक्ष्यपूर्ती करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थी बालकांपर्यंत लस पोहोचविण्यासाठी दि. २९ जून ते दि. ३ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या २६ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत शहरभर व्यापक नियोजन करण्यात आले होते. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रुग्णालये, रेल्वे स्थानके, बस डेपो, बाजारपेठा, मॉल आणि इतर गर्दीच्या ठिकाणी ६१५ स्थायी, ७४ ट्रान्झिट आणि २७ फिरते मोबाईल असे एकूण ७१६ लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. या सर्व केंद्रांवर पालकांनी आपल्या लहान मुलांना घेऊन उपस्थित राहून पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजले.
मोहिमेदरम्यान नवी मुंबईच्या महापौर श्रीमती सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कुकशेत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत काही बालकांना स्वतः पोलिओचे डोस पाजले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
पोलिओमुक्त समाजाचे उद्दिष्ट कायम राखण्यासाठी “दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी” या घोषवाक्याअंतर्गत मोहिमेपूर्वी शहरभर व्यापक जनजागृती करण्यात आली होती. नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना पोलिओ लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच विविध भागांमध्ये पालकांशी थेट संपर्क साधून बालकांना लसीकरणासाठी बूथवर आणण्याचे आवाहन करण्यात आले.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने केलेल्या नियोजनामुळे लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे पार पडली. बूथवरील कर्मचारी, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक यांनी दिवसभर विविध केंद्रांवर कार्यरत राहून बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस दिली. त्यामुळे पहिल्याच दिवशी सुमारे ८५ टक्के लाभार्थी बालकांपर्यंत लसीकरण पोहोचले.
महानगरपालिका प्रशासनाने आता उर्वरित लाभार्थी बालकांपर्यंत लस पोहोचविण्यासाठी दि. २९ जून ते दि. ३ जुलै २०२६ या कालावधीत विशेष घरभेट मोहीम आखली आहे. या काळात आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक प्रत्येक घरी भेट देऊन ज्या बालकांना बूथवर येऊन लस घेता आली नाही, अशा बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजणार आहेत.
महापौर श्रीमती सुजाता सुरज पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घरभेटीदरम्यान येणाऱ्या महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना व स्वयंसेवकांना पूर्ण सहकार्य करावे आणि शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू देऊ नये.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या उद्दिष्टांनुसार प्रत्येक पात्र बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाकडून पुढील काही दिवस विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
