‘ऑपरेशन टायगर’नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ;
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील घडामोडींना वेग आला असून, शिंदे गटाच्या कथित ‘ऑपरेशन टायगर’ला यश मिळाल्यानंतर ठाकरे गटातील काही खासदारांच्या भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असलेल्या सहा खासदारांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने या सर्व खासदारांना तातडीने ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य सरकारच्या गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांनी दि. १७ जून रोजी यासंदर्भात अधिकृत वायरलेस संदेश जारी केला. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच संबंधित लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
गृह विभागाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना तातडीने आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही उपाययोजना करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
‘वाय प्लस’ सुरक्षा मिळालेले सहा खासदार पुढीलप्रमाणे :
१. संजय देशमुख – यवतमाळ लोकसभा मतदारसंघ
२. संजय जाधव – परभणी लोकसभा मतदारसंघ
३. संजय दिना पाटील – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
४. नागेश पाटील आष्टीकर – हिंगोली लोकसभा मतदारसंघ
५. ओमराजे निंबाळकर – धाराशिव लोकसभा मतदारसंघ
६. भाऊसाहेब वाघचौरे – शिर्डी लोकसभा मतदारसंघ
दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी बंडखोर खासदारांवर कठोर शब्दांत टीका करत त्यांना जनतेसमोर पुन्हा जाण्याचे आव्हान दिले.
संजय राऊत म्हणाले, “ज्या पक्षाच्या नावावर, विचारांवर आणि चिन्हावर तुम्ही निवडून आला आहात, त्या पक्षाशी बेइमानी करून दुसऱ्या मार्गाने जाणार असाल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा जनतेचा कौल घेऊन निवडून या.”
यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’ला प्रत्युत्तर म्हणून “ऑपरेशन तुडवा” राबविणार असल्याचा इशाराही दिला. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षात अशा प्रकारची राजकीय भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी संबंधित खासदारांवर निशाणा साधला. “तुम्ही तुमची फौज घेऊन या, आम्ही आमची फौज घेऊन येतो. जर या खासदारांना कोणताही धोका नसल्याचा दावा केला जात असेल, तर मग सरकारने त्यांना तातडीने ‘वाय प्लस’ सुरक्षा का दिली?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, या सहा खासदारांची पुढील भूमिका राज्याच्या राजकारणात निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

