??????????????
“गुणवान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांनी परस्पर सहकार्य वाढवावे” – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच देशातील विविध राज्यांमधील गुणवान खेळाडूंना अधिक चांगल्या प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी परस्पर सहकार्य वाढविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या शिष्टमंडळाने लोकभवन येथे राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील क्रीडा विकास, युवकांना प्रशिक्षणाच्या संधी आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रोत्साहन या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
माजी खासदार तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले की, देशाच्या उत्तर-पूर्वेकडील राज्यांमध्ये अनेक गुणवान आणि नैसर्गिक प्रतिभा लाभलेले खेळाडू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा आणि प्रगत प्रशिक्षण व्यवस्थेचा अभाव जाणवतो. महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्रासाठी उत्कृष्ट सुविधा, प्रशिक्षक आणि आधुनिक प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध असल्याने अशा खेळाडूंना महाराष्ट्रात प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. यामुळे राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा विकासाला चालना मिळेल.
राज्यपालांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्राने क्रीडा क्षेत्रात देशात अग्रगण्य स्थान निर्माण केले आहे. विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या अनुभवाचा आणि सुविधांचा लाभ इतर राज्यांतील खेळाडूंनाही मिळावा. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेच्या अनुषंगाने राज्यांदरम्यान क्रीडा आदानप्रदान वाढवून विविध खेळांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा.
यावेळी युवकांना लहान वयापासूनच क्रीडेकडे वळविणे, ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे, क्रीडा संस्कृती अधिक बळकट करणे आणि राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे योगदान वाढविणे याबाबतही विचारमंथन करण्यात आले.
या बैठकीस महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे, सहसचिव डॉ. प्रदीप खांडरे, अखिल भारतीय टेनिस संघटनेचे महासचिव सुंदर अय्यर, त्रिपुरा ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव तथा अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सहसचिव सुजित रॉय यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
देशभरात क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्यांमधील समन्वय, आधुनिक प्रशिक्षण सुविधा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक आणि प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित करत महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा विकासात अधिक सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले.
