सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग; भूसंपादन आणि पायाभूत सुविधा कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
नाशिक, दि. ८ : पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विविध विकासकामांना गती देण्यास सुरुवात केली असून कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेली सर्व पायाभूत सुविधा आणि भूसंपादनाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दिले आहेत. लाखो भाविक, साधू-संत आणि देश-विदेशातील पर्यटकांच्या उपस्थितीचा विचार करता कुंभमेळ्याच्या तयारीत कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित ‘भूसंपादन – सद्यस्थिती व अपेक्षित मार्गदर्शन’ या विशेष आढावा बैठकीत अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर बोलत होते. बैठकीस नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय सल्लागार ब्रजेश दीक्षित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, डॉ. पवन दत्ता, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांच्यासह महसूल, वन आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी अपर मुख्य सचिव म्हैसकर यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक मेळ्यांपैकी एक असून लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या सोयी-सुविधा लक्षात घेऊन दर्जेदार आणि शाश्वत पायाभूत सुविधा उभारणे अत्यावश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी.
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक परिक्रमा मार्ग, साधूग्राम, वाहनतळ, रेल्वे स्थानकांचा विकास, ऊर्जा पुरवठा, रस्ते सुधारणा, वाहतूक व्यवस्थापन, वनसंवर्धन आणि पर्यावरणीय उपाययोजना यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे. या सर्व प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
म्हैसकर यांनी स्पष्ट केले की, महसूल विभागाने नियमांचे पालन करत भूसंपादनाच्या प्रस्तावांचा तातडीने निपटारा करावा. विकासकामांच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे निर्माण होणार नाहीत, यासाठी सर्व विभागांनी एकात्मिक पद्धतीने कार्य करणे आवश्यक आहे. कुंभमेळ्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या कामांची पूर्तता होण्यासाठी वेळापत्रकानुसार कामकाज पूर्ण करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनीही कुंभमेळ्याच्या तयारीबाबत मार्गदर्शन करत विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय राखण्यावर भर दिला. त्यांनी विकासकामे आणि भाविकांच्या सुविधांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती सादर केली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सध्या भूसंपादनाचे एकूण २२ प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. यामध्ये रेल्वे स्थानकांचा विस्तार, राष्ट्रीय महामार्ग विकास, पाटबंधारे विभागाची कामे, त्र्यंबक नगरपरिषद, नाशिक महानगरपालिका आणि नाशिक परिक्रमा मार्गाशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, बहुतांश प्रस्तावांचा अंतिम निर्णय घेऊन संबंधित जागांचा ताबा देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक विकासकामांना प्रत्यक्ष गती मिळाली असून उर्वरित प्रस्तावांवरील प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केली जात आहे. कुंभमेळ्यापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थ कुंभमेळा हा धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सोहळा मानला जातो. लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे वाहतूक, निवास, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि सुरक्षा व्यवस्थेवर मोठा ताण येत असतो. त्यामुळे यंदाच्या कुंभमेळ्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा, सुधारित वाहतूक व्यवस्था, विस्तारित रस्ते, सुसज्ज साधूग्राम आणि पर्यावरणपूरक नियोजनावर विशेष भर दिला जात आहे.
राज्य शासन, कुंभमेळा विकास प्राधिकरण, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी वेगाने सुरू असून भाविकांना सुरक्षित, सुकर आणि सुविधायुक्त अनुभव देण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
