“अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी शिक्षण अभियान; १५ ऑगस्टनंतर मुदतवाढ नाही” — मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. २६ : राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. या उपक्रमासाठी रिक्षा-टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवून पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींशी मराठी भाषा शिक्षण उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्यातील प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक सुलभ आणि प्रभावी व्हावा यासाठी व्यवहारिक मराठी शिकविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. त्यासाठी चालकांना दररोज चार तासांचे ऑफलाइन प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय ऑनलाइन प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असून चालकांना त्यांच्या सोयीप्रमाणे शिक्षण घेता येणार आहे.
प्रशिक्षण अधिक परिणामकारक आणि सहज उपलब्ध व्हावे यासाठी परिवहन विभागाच्या विविध शाखा कार्यालयांमध्ये विशेष वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. प्रारंभी मुंबई, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, पालघर आणि डहाणू या भागांमध्ये हे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या अभियानासाठी कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. चालकांना सोप्या पद्धतीने मराठी शिकविण्यासाठी सुमारे ४५०० शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना मानधनही दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी आवश्यक निधीची तरतूद शासनाने केली असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषा शिकविण्याबरोबरच चालकांच्या संभाषण कौशल्यावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चालकांची मौखिक परीक्षा घेतली जाईल आणि यशस्वी उमेदवारांना शासनाकडून अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तसेच हिंदी ते मराठी भाषांतर आणि दैनंदिन संभाषण सहज शिकता यावे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऑनलाइन ॲप विकसित करण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून चालकांना मराठी शब्द, वाक्यरचना आणि व्यवहारातील संवाद सुलभ पद्धतीने शिकता येणार असल्याचे सांगण्यात आले.
या उपक्रमामुळे प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल, मराठी भाषेचा वापर वाढेल आणि राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्थानिक भाषेचे महत्त्व अधिक दृढ होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात मराठी भाषेचा वापर अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे.
