‘कॉकरोच जनता पार्टी’ची सोशल मीडियावर धूम; प्रचंड लोकप्रियतेनंतर ‘एक्स’ खाते भारतात बंद
मुंबई, दि. २१ : देशभरात सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून अवघ्या काही दिवसांत या पेजने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. विशेषतः इन्स्टाग्रामवर या पेजला मिळालेल्या प्रतिसादामुळे राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे ‘एक्स’वरील खाते भारतात बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या इन्स्टाग्राम खात्याला अवघ्या ६ दिवसांत तब्बल १ कोटी ३० लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. या आकड्यामुळे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या संख्येत या पेजने भारतीय जनता पक्षालाही मागे टाकल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तसेच आगामी काही तासांत काँग्रेसच्या अधिकृत खात्यालाही फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोशल मीडियावर व्यंगात्मक शैली, राजकीय भाष्य आणि तरुणांमध्ये लोकप्रिय ठरत असलेल्या आशयामुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’ची लोकप्रियता झपाट्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वापरकर्त्यांनी या पेजवरील पोस्ट आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केल्याने त्याचा प्रभाव अधिक वाढला आहे.
मात्र, याचदरम्यान ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या ‘एक्स’ खात्यावर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित खाते भारतात बंद करण्यात आले असून यामागील अधिकृत कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. खाते बंद झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्वतः या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, इन्स्टाग्राम खाते बंद करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. मात्र ते शक्य न झाल्यानंतर ‘एक्स’वरील खाते भारतात बंद करण्यात आले. या कारवाईबाबत कोणतीही अधिकृत पूर्वसूचना मिळाली नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, ‘एक्स’कडून किंवा संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खाते बंद करण्यामागील कारणांबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या कारवाईमागे नेमके कारण काय, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सोशल मीडिया क्षेत्रात अल्पावधीत मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवणाऱ्या या पेजच्या खात्यावर झालेल्या कारवाईनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, डिजिटल प्लॅटफॉर्मवरील नियम आणि सामाजिक माध्यमांवरील नियंत्रण याविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
