नीट पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन अधिक गडद
लातूर, दि. १८ : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्रातील लातूरचे धागेदोरे अधिक स्पष्ट होत असून केंद्रीय अन्वेषण विभागाने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली असून न्यायालयाने त्यांना नऊ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे राज्यातील कोचिंग नेटवर्क आणि प्रश्नपत्रिका गळती रॅकेटबाबत मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका गळती प्रकरणात सीबीआयने यापूर्वी अनेक संशयितांची चौकशी केली होती. त्यानंतर लातूरमधील काही कोचिंग संस्थांवर तपासाची सुई वळली. सीबीआयने प्रथम शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेऊन ट्रान्झिट रिमांडवर चौकशी केली होती. या प्राथमिक चौकशीत महत्त्वाचे डिजिटल पुरावे आणि संपर्क साखळी उघड झाल्यानंतर त्यांना औपचारिक अटक करण्यात आली.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर याच्या मोबाईल फोनमध्ये कथितरीत्या फुटलेली रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका आढळून आली आहे. ही प्रश्नपत्रिका त्याला २३ एप्रिल रोजी मिळाल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, मोटेगावकर हा निवृत्त प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी यांच्या संपर्कात होता आणि दोघांमध्ये सातत्याने संवाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे. याच संपर्कातून पेपरफुटीचे जाळे उघडकीस आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सीबीआयने न्यायालयात मांडलेल्या माहितीनुसार, लातूरमधील कोचिंग नेटवर्कमार्फत प्रश्नपत्रिकांचे वितरण केले जात असल्याचा संशय आहे. तपास अधिकारी पवन कौशिक यांनी न्यायालयाला सांगितले की, निवृत्त प्राध्यापक कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्यातील संपर्कातूनच प्रश्नपत्रिका गळतीचा मागोवा लागला. तपासादरम्यान काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल डेटा आणि कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
सीबीआयने न्यायालयाकडे आरोपीसाठी दहा दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने नऊ दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली. त्यामुळे पुढील नऊ दिवस मोटेगावकर यांची कसून चौकशी केली जाणार असून, या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, न्यायालय परिसरात माध्यम प्रतिनिधींनी “आपल्याला या प्रकरणाबद्दल पश्चाताप आहे का?” असा प्रश्न विचारला असता शिवराज मोटेगावकर यांनी कोणतेही उत्तर न देता पत्रकारांकडे रोषाने पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांच्या पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त होत असताना, केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांवर कठोर कारवाईची मागणी वाढत आहे.
दरम्यान, सीबीआयकडून लातूर, पुणे आणि इतर काही शहरांमध्ये तपास सुरू असून, प्रश्नपत्रिका गळतीमागील आर्थिक व्यवहार, कोचिंग नेटवर्क आणि तांत्रिक माध्यमांचा वापर याचाही शोध घेतला जात आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी अटकसत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
