Oplus_131072
दोषींवर कठोर कारवाईचे आदेश
मुंबई, दि. २३ : नवी मुंबई महानगरपालिकेतील आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. विधान भवन येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
बैठकीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील विविध कामांमध्ये अनावश्यक खर्च झाल्याचे प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
उपाध्यक्ष बनसोडे यांनी अहवालामध्ये कामांशी संबंधित सर्व ठेकेदारांची नावे स्पष्टपणे नमूद करण्याचे निर्देश दिले. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यासोबतच संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) समाविष्ट करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता राखणे आणि सार्वजनिक निधीचा योग्य वापर सुनिश्चित करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अशा प्रकारच्या अनियमितता आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असा इशाराही बैठकीत देण्यात आला. या प्रकरणाच्या पुढील तपासावर प्रशासनाचे लक्ष असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
