महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई; आयातदार अटकेत
मुंबई, दि. २१ : महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), मुंबई पथकाने न्हावा शेवा बंदरात मोठी कारवाई करत प्रतिबंधित कृषी मालाच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीनुसार करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण १३२ कंटेनर जप्त करण्यात आले असून त्यामधील मालाची किंमत सुमारे १३९ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तूर डाळ/पिजन पीज’ या नावाखाली आयात दाखविण्यात आलेल्या या कंटेनरमध्ये प्रत्यक्षात सुमारे ३,०२९ मेट्रिक टन कृषी माल आढळून आला. सखोल तपासणीनंतर यामध्ये टांझानिया आणि सुदानमधून आयात करण्यात आलेल्या सुमारे २,७१० मेट्रिक टन टरबूज बिया तसेच कॅनडामधून आणलेला सुमारे ३१९ मेट्रिक टन हिरवा वाटाणा असल्याचे उघड झाले.
तपासादरम्यान आयातदारांकडून सरकारने लागू केलेल्या निर्बंधांना चुकवण्यासाठी जाणीवपूर्वक चुकीची माहिती सादर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल २०२४ मधील अधिसूचनेनुसार जून २०२४ नंतर खरबूज व टरबूज बियांच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच हिरव्या वाटाण्याच्या आयातीसाठी किमान आयात किंमत निश्चित करण्यात आली असून विशिष्ट बंदरातूनच आयात करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या आयातदार कंपनीच्या मालकाला दि. १९ एप्रिल २०२६ रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाकडून अशा प्रकारच्या तस्करीविरोधात गुप्त माहितीच्या आधारे कारवाया अधिक तीव्र करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. देशाच्या आर्थिक हितांचे संरक्षण, देशांतर्गत उत्पादकांना न्याय्य स्पर्धा आणि आयात नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी अशा कारवाया सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
Photo Credit – PIB
