महिला आरक्षण मुद्द्यावरून रोहिणी खडसे यांचा चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल
मुंबई, दि. २० : महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री यांनी महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करण्याचे आव्हान दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ते स्वीकारले. त्यानंतर चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी सोशल माध्यमांवरून प्रतिक्रिया देत प्रतिउत्तर दिले.
रोहिणी खडसे म्हणाल्या की, “सुप्रियाताई सुळे यांनी खुलं आव्हान काय स्वीकारलं तर लोकांच्या पायाखालची जमीनच सरकलेली दिसत आहे. चर्चेला येण्याची त्यांची हिंमत नाही. आपण एक्सपोज होऊ म्हणून ‘चित्रा’विचित्र माणासांना छू… म्हटलं.”
तसेच त्यांनी पुढे म्हटले की, “बरं या ‘चित्रा’विचित्र माणसांची जागा काय? तर आधी यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना बाप म्हणून, आदरणीय सुप्रियाताईंना मोठी बहीण म्हणून पदे मिळवली, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली आणि आमदारकीचा तुकडा काय टाकला की पक्ष सोडून गेले. तिकडे गेल्यावर देखील पवार साहेब, सुप्रियाताई यांच्यावर टीका केल्यावरच यांचे घर चालते. अशा लोकांनी तरी सुप्रियाताई सुळेंवर बोलू नये.” दरम्यान, महिला आरक्षण विधेयकावरून राज्यातील राजकीय वाद अधिक तीव्र होत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे.
