धर्मादाय आरोग्य प्रकल्पांना शासनाचे पाठबळ देण्याची दिली ग्वाही
पुणे, दि. १६ : सेवाभावनेने कार्य करणाऱ्या धर्मादाय संस्थांना शासनाचे सहकार्य राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नांदोशी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या रुग्णालय प्रकल्पाच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते.
या प्रकल्पामध्ये रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून विविध स्तरांवरून या उपक्रमाला सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. रुग्णालयाकडे येण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, विशेषतः पुरेशा रुंदीचा रस्ता आणि पाण्याची सोय महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच धर्मादाय संस्थांच्या इमारतींसाठी आकारल्या जाणाऱ्या प्रीमियममध्ये काही प्रमाणात सवलत देण्याचा विचारही शासन स्तरावर सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या समारंभास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महापौर मंजुषा नागपुरे, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष पं. हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सध्याच्या काळात प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. धर्मादाय संस्था आरोग्य क्षेत्रात काम करत असताना अनेकदा व्यवस्थापनात व्यावसायिकता दिसून येते; मात्र त्याचबरोबर सेवाभाव जपणे महत्त्वाचे आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सेवाभाव आणि गुणवत्ता यांचा आदर्श निर्माण केला असून त्याच धर्तीवर या नव्या प्रकल्पातूनही नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रस्तावित रुग्णालयात विविध उपचार पद्धती, रुग्ण पुनर्वसन केंद्र तसेच कर्करोग उपचार केंद्राचा समावेश असणार असून त्यामुळे सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले.
मंगेशकर कुटुंबाच्या योगदानाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, या कुटुंबाने संगीत क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत देशसेवेचे कार्यही सातत्याने केले आहे. संकटकाळात समाजासाठी पुढाकार घेण्याची परंपरा त्यांनी जपली असून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सेवेला प्राधान्य देत आरोग्यसेवा पुरवण्याची ही परंपरा नव्या प्रकल्पातूनही पुढे चालू राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दिवंगत आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मंगेशकर कुटुंबाने आयुष्यभर स्वरांची सेवा केली. आशा भोसले यांनी जीवनातील कठीण प्रसंगांना सकारात्मकतेत रूपांतरित करत आपले व्यक्तिमत्त्व घडवले. त्यांची ऊर्जा आणि सादरीकरणातील जिवंतपणा विलक्षण होता. वयाच्या नव्वदीतही दीर्घ मैफली सादर करण्याची त्यांची क्षमता उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
