त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांसाठी दर्जेदार सुविधांवर भर; कुंभमेळा तयारीचा शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला आढावा
नाशिक, दि. ९ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर भाविकांना अधिकाधिक चांगल्या व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
त्र्यंबकेश्वर नगरपरिषद येथे मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्ष मंजू वारुंगसे, मुख्याधिकारी गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री भुसे यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने येत्या ऑक्टोबर महिन्यात ध्वज स्थापना होणार असून त्याआधी सर्व प्रस्तावित विकासकामे पूर्ण करण्यासाठी वेग देणे आवश्यक आहे. शहरातील रस्त्यांचे मजबुतीकरण, वीज केबल्स भूमिगत करण्याची कामे तसेच सुशोभीकरण यावर विशेष भर देण्यात यावा, असे त्यांनी नमूद केले.
कुंभमेळ्याच्या कामांमुळे बाधित होणाऱ्या व्यापारी व दुकानदारांचे योग्य पुनर्वसन करण्याचे निर्देश देताना त्यांनी प्रशासनाने यासाठी पर्यायी व्यवस्था सुनिश्चित करावी, असे स्पष्ट केले. तसेच आरोग्य सुविधांच्या दृष्टीने सुमारे १ हजार ३०० खाटांचे नियोजन करण्यात आले असून दर्शन मार्गालगत शासकीय रुग्णालय उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
सुरक्षेच्या दृष्टीने कुंभमेळा काळात पोलीस बंदोबस्त मजबूत ठेवण्यासोबतच सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यावरही भर देण्यात आला. याशिवाय शहरातील शैक्षणिक सुविधांचा विचार करून नवीन जिल्हा परिषद शाळेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांकडून कामांना गती देण्यात येत असून भाविकांच्या सोयीसाठी सर्वंकष नियोजन केले जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
