तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश
नाशिक, दि. ५ : नाशिक जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नर तालुक्यातील बाधित गावांना भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.
मंत्री महाजन यांनी चिंचोली व वडगाव पिंगळा या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देत नुकसानीची माहिती जाणून घेतली. चिंचोली येथे शेतकरी रमेश नागरे यांच्या कांदा पिकाची तसेच आनंदीबाई काशिनाथ कांगणे यांच्या बीट आणि कांदा पिकाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर वडगाव पिंगळा येथे विठ्ठल सांगळे आणि कचरू गंधास यांच्या शेतीमधील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान गारपीटीमुळे कांदा, भाजीपाला आणि इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. काही ठिकाणी उभे पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून, शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी यावेळी उपस्थित केली.
मंत्री महाजन यांनी संबंधित महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसानीचा अचूक व सविस्तर अहवाल तयार करून तो शासनाकडे तात्काळ सादर करावा, असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. शेतकऱ्यांना मदत मिळण्यात विलंब होऊ नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही जलद गतीने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, “शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये,” असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले.
दरम्यान, हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे अवकाळी पावसाचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत असून, जिल्हा प्रशासनाकडून पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे मार्गदर्शनही सुरू केले आहे.
या पाहणी दौऱ्यात स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महसूल, कृषी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्याचे काम सुरू असून, पुढील काही दिवसांत संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थितीचे मूल्यमापन पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
