ॲसिड हल्ला पीडितेस शासनाकडून सर्वतोपरी मदतीची महिला व बालविकास मंत्र्यांनी दिली हमी
शिर्डी/संगमनेर, दि. ५ : संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे घडलेल्या ॲसिड हल्ल्याच्या अत्यंत गंभीर आणि निंदनीय घटनेनंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांशी सविस्तर संवाद साधत शासन तिच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला. पुढील सर्व वैद्यकीय उपचारांचा संपूर्ण खर्च शासनाकडून करण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली.
रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, तिचे वय लहान असल्याने आणि त्वचा अतिसंवेदनशील असल्याने तिला काही दिवस अधिक उपचारांची आवश्यकता आहे. तसेच, पुढील टप्प्यात किमान एका शस्त्रक्रियेची गरज भासू शकते, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. डॉक्टरांकडून तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या घटनेनंतर मुलीच्या मानसिक स्थितीचाही विचार करून तिला विशेष समुपदेशनाची सुविधा देण्यात आली आहे. तज्ज्ञ समुपदेशकांच्या मदतीने तिचे समुपदेशन सुरू असून, पुढील काळातही हे समुपदेशन सातत्याने आणि प्रभावीपणे सुरू ठेवण्याबाबत प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आहे.
दरम्यान, पीडितेच्या कुटुंबावर कोणताही आर्थिक ताण येऊ नये यासाठी शासनाने विविध योजनांद्वारे तातडीची मदत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महिला व बालविकास विभागाच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत पीडितेस १ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य तत्काळ देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, न्याय विभागाच्या ‘व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम २०२२’ अंतर्गत कुटुंबाला आधीच ३ लाख रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे.
मंत्री तटकरे यांनी सांगितले की, घटनेच्या पहिल्या दिवसापासूनच त्या जिल्हा पोलीस प्रशासनाच्या संपर्कात असून तपासाची प्रगती सातत्याने आढावा घेतला जात आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा वेगाने कार्यरत असून विविध तांत्रिक साधनांचा आणि इतर यंत्रणांचा समन्वय साधला जात आहे. कुटुंबीयांकडे काही अतिरिक्त माहिती असल्यास ती पोलिसांना उपलब्ध करून द्यावी, तसेच त्यांच्या काही अपेक्षा असल्यास त्या प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या भेटीदरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबातील सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाकडून या प्रकरणात संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्यवाही सुरू असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. ही घटना समाजासाठी गंभीर इशारा मानली जात असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा शासनाचा निर्धार असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
