रोनाल्ड मॅकडोनल्ड हाऊस इंडियाचा गेल्या दहा वर्षांत ३५,००० हून अधिक कुटुंबांना आधार
मुंबई, दि. २० : लायन्स क्लब ऑफ जुहू यांच्या वतीने, मुंबईच्या माहीम येथील रोनाल्ड मॅकडोनल्ड हाऊस इंडियामध्ये राहणाऱ्या कुटुंबांच्या सहाय्यासाठी विशेष रुग्ण वाहतूक व्हॅन प्रदान करण्यात आली आहे. हा उपक्रम लायन्स क्लब्स इंटरनॅशनल फाउंडेशन (LCIF) इंडिया यांच्या सहकार्याने आणि धवल पारेख व कुटुंब तसेच लायन राजेश अग्रवाल यांच्या RKG आर्क फाउंडेशन यांच्या पाठिंब्यामुळे साकार झाला आहे.
विश्वासार्ह वाहतूक ही रोनाल्ड मॅकडोनल्ड हाऊसमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कर्करोग व इतर गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या या मुलांना उपचार, डॉक्टरांचा सल्ला आणि नियमित फॉलो-अपसाठी वारंवार रुग्णालयात जावे लागते. अशा कठीण काळात ही व्हॅन त्यांच्यासाठी सुरक्षित, सुलभ आणि पूर्णपणे मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देईल. ही सेवा मुलांच्या उपचार प्रवासाला अधिक सोयीस्कर आणि दिलासा देणारी ठरेल. या व्हॅनमध्ये एकावेळी १२ ते १४ मुले व त्यांचे पालक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करू शकतील.
रोनाल्ड मॅकडोनल्ड हाऊस इंडिया हे माहीम येथे स्थित असून, गंभीर आजारांनी ग्रस्त मुलांच्या कुटुंबांसाठी एक महत्त्वाचे आधारकेंद्र आहे. येथे कुटुंबांना मोफत निवास, पौष्टिक आहार तसेच मानसिक व सामाजिक आधार दिला जातो, ज्यामुळे ते त्यांच्या मुलांच्या उपचारांवर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतात. स्वच्छ व सुरक्षित वातावरण, खाजगी खोल्या आणि आवश्यक सुविधा यांमुळे उपचाराच्या कठीण काळात कुटुंबांना दिलासा मिळतो. महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमधून उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या अनेक कुटुंबांना या केंद्राचा मोठा लाभ होतो. रोनाल्ड मॅकडोनल्ड हाऊस त्यांना या आव्हानात्मक काळात मोफत निवास व आधार देऊन त्यांच्या प्रवासात महत्त्वाची साथ देत आहे.
रोनाल्ड मॅकडोनल्ड हाऊस इंडिया यांच्या अध्यक्षा स्मिता जाटिया म्हणाल्या, घरापासून दूर असणाऱ्या आणि ज्यांची मुले गंभीर आजाराशी झुंज देत आहेत अशा कुटुंबांच्या सोबत “रोनाल्ड मॅकडोनल्ड हाऊस इंडियामध्ये आम्ही कायम सोबत उभे आहोत. मुलांना योग्य उपचार मिळून ते पूर्णपणे बरे व्हावेत यासाठी मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात येणाऱ्या पालकांना भावनिक आणि आर्थिक आधार गरजेचा असतो. अशावेळी मुंबईत या कुटुंबांना रुग्णालयाच्या जवळ राहण्यायोग्य जागा उपलब्ध करून दिल्यामुळे या कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळतो. यामुळे पालकांना मुलांच्या उपचारावर लक्ष केंद्रित करता येते आणि मुलांना चांगले उपचार मिळून ते लवकरात लवकर बरे होतात. हीच आमचे प्रयत्न यशस्वी झाल्याची पोचपावती आहे. या उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ जुहू, LCIF इंडिया आणि सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक आभार.”
लायन्स क्लब ऑफ जुहूचे प्रकल्प समन्वयक व माजी जिल्हा गव्हर्नर लायन उमेश गांधी म्हणाले, “रोनाल्ड मॅकडोनल्ड हाऊस माहीमला सहाय्य करणे हे आमच्या समाजसेवेचा भाग आहे. या वाहतूक सुविधेमुळे कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करता येईल, अशी आम्हाला आशा आहे.” या उपक्रमातून लायन्स क्लब ऑफ जुहू, LCIF इंडिया, त्यांचे देणगीदार आणि रोनाल्ड मॅकडोनल्ड हाऊस इंडिया यांची सामाजिक बांधिलकी दिसून येते.
यावेळी धवल पारेख व कुटुंब तसेच लायन राजेश अग्रवाल यांच्या RKG आर्क फाउंडेशनच्या या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. तसेच अध्यक्ष लायन अक्षय मेहता यांच्या नेतृत्वाखाली लायन प्रणव भगत, लायन शैलेश मेहता, आणि FRC टीममधील लायन राहुल नरुला, लायन राजेश शाह व लायन शंभुभाई त्रिवेदी यांच्या योगदानाचेही कौतुक करण्यात आले.
रोनाल्ड मॅकडोनल्ड हाऊस इंडिया ही जागतिक रोनाल्ड मॅकडोनल्ड हाऊस नेटवर्कची भारतीय शाखा असून, गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी ३५,००० हून अधिक कुटुंबांना सहाय्य केले आहे. या उपक्रमात १,००० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. ग्रामीण आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना मोलाचा आधार देऊन त्यांना दिलासा दिला जातो. कुटुंब-केंद्रित सेवा मॉडेलमुळे उपचार प्रक्रिया अधिक सुरळीत होते.
