पोलिस व महापालिका रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर होतेय टीका
नवी मुंबई, दि. १० : मित्राच्या लग्नासाठी स्वीडनहून नवी मुंबईत आलेल्या एका पंचवीस वर्षीय तरुणाचा सानपाडा परिसरात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एल्डे एडवर्ड जान असे या तरुणाचे नाव असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेच्या परिस्थितीबाबत विविध शक्यता व्यक्त होत असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एल्डे एडवर्ड हा आपल्या मित्र प्रणय शाह यांच्या लग्नासाठी नवी मुंबईत आला होता. वाशी येथील एका बँक्वेट सभागृहात लग्न समारंभ पार पडल्यानंतर तो मित्रांसोबत बाहेर गेला होता. त्यानंतर मद्यपान करून परत येत असताना पहाटेच्या सुमारास तो सानपाडा सेक्टर १ परिसरात पोहोचला. याच दरम्यान तो रस्ता चुकल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुण एका इमारतीच्या परिसरात प्रवेश करताना सुरक्षा भिंत ओलांडून आत गेला. त्यानंतर तो इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही चित्रफितीत तो गेटवरून उडी मारून आत जात असल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. मद्याच्या नशेत तोल जाऊन अपघात झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र, या घटनेबाबत काही स्थानिक नागरिकांनी वेगळी बाजू मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही अज्ञात व्यक्ती या तरुणाचा पाठलाग करत होते. त्यामुळे घाबरून तो साईराज कॉम्प्लेक्स परिसरात उडी मारून आत शिरला. या दरम्यान त्याला दुखापत झाली. त्यानंतर तो इमारतीत वर जाण्याचा प्रयत्न करत असताना जिन्यातच कोसळला. त्याच्या पोटाच्या भागातून रक्तस्राव सुरू असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्या अवस्थेतही संबंधित तरुण शुद्धीत होता आणि “मी ठीक आहे, मात्र पायाला दुखापत झाली आहे,” असे सांगत होता. पोलिसांना माहिती देऊनही त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात विलंब झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्याचा जीव वाचू शकला असता, असेही काही नागरिकांनी म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित तरुणाच्या मित्राला सायन रुग्णालयात त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर प्रणय शाह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणात सोशल माध्यमांवरही प्रतिक्रिया उमटत असून, सानपाड्यात याच भागात राहणाऱ्या, एका माध्यमाचे संपादक असलेल्या संजय मलमे यांच्या डोळ्यासमोर हि घटना घडली. या संदर्भात फेसबुक वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी पोलिस व वैद्यकीय यंत्रणेवर निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत. एका परदेशी नागरिकाच्या अडचणीच्या वेळी योग्य प्रतिसाद न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली आहे.
डोळ्यासमोर एका परदेशी तरुणाच्या झालेल्या मृत्यूने प्रचंड अस्वस्थ करून सोडले आहे. एक विदेशी तरुण आपल्या भारतात आलेला आहे, त्याच्या संकटाच्या काळात मानवी अनास्थेमुळे भारतीय पोलीस आणि वैद्यकीय मदत देण्यात यंत्रणा कशी कुचकामी ठरली हे उघड्या डोळ्यांनी पाहिले. एखाद्या हॉलीवूडच्या हिरोसारखा दिसणाऱ्या तिशीच्या आतल्या देखण्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत व्हावा आणि आपण काहीच करू शकलो नाही, याच्या प्रचंड वेदना होत आहेत.
नवी मुंबईतील सानपाडा येथील सेक्टर १ मध्ये रविवारी पहाटे पावणे दोन वाजता एक परदेशी तरुण रक्तबंबाळ अवस्थेत आश्रयासाठी साईराज कॉम्प्लेक्स सोसायटीत येथे पोहचला. काहीजण पाठलाग करत असल्याचे तो सांगत होता. तो प्रचंड घाबरला होता. तो भिंतीवरून उडी मारून दुसऱ्या सोसायटीत गेला. त्याची जीव वाचवण्याची धडपड सुरू होती. त्याने लिफ्टमधून वर जाण्याचा प्रयत्न केला. त्याला चालणे अशक्य झाल्याने तो कोसळला.त्याचवेळी मी तिथे पोहचलो. पोलीस हेल्पलाईनला फोन करून माहिती दिली. ती व्यक्ती परदेशी असल्याने त्यामागील गांभीर्य संबंधित ऑपरेटरला लक्षात आणून दिले. माझ्या अगोदरही तेथील रहिवाश्यांनी पोलीस हेल्पलाईनला कळवले होते. मात्र अर्ध्या तासांनंतरही कुठलीही पोलीस वा वैद्यकीय मदत आली नव्हती. त्या काळात तो विदेशी तरुण वेदनेने विव्हळत पडला होता. त्याच्या वेदना असह्य झाल्याचे पाहून सोसायटीतील दोन रहिवाशी मोटरसायकलवर सानपाडा पोलीस स्टेशनला पोहचले. ही घटना घडली, तेथून पोलीस स्टेशन अवघ्या ३०० मीटर अंतरावर आहे.पोलीस ठाण्याच्या प्रशस्त इमारतीचे तीन- चार महिन्यापूर्वीच उद्घाटन झाले आहे. हे नागरिक पोलीस स्टेशनमध्ये पोहचले तेव्हा तिथे एकही पोलीस नव्हता. काही पोलीस वरच्या मजल्यावर झोपले होते, त्यांना उठवून माहिती दिली असता त्यांनी नागरिकांवरच संताप केला होता. कोणी जखमी अवस्थेत पडला असेल तर रुग्णवाहिकेला कळवा, इकडे का आलात? असा त्यांचा सवाल होता.दरम्यानच्या काळात पोलीस यंत्रणेकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने मी स्वतः सानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांना पहाटे ३ वाजता फोन केला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. शेवटी पहाटे नंतर पोलीस दोन पोलीस आले. कठाळे यांनी दुसऱ्या दिवशी १२ वाजता प्रतिसाद दिला. आपल्या व्यवस्था किती तत्पर आहे, यावरून अंदाज यावा.या दरम्यान माझी कन्या त्या परदेशी तरुणाशी संवाद साधत होती. त्याच्याशी बोलत होती. त्याला तिने विचारले असता तो स्टॉकहोमचा असल्याचे म्हणाला. यावरून तो स्वीडनचा असण्याचा शक्यता आहे. जखमी अवस्थेत पडून सव्वा तास झाला होता. तो प्रवण म्हणून बोलत होता. शिवाय त्याच्या हातावर मेहंदी होती. त्यामुळे तो एखाद्या मित्रांच्या लग्नसोहळ्यासाठी तो भारतात आला असावा. त्याच्या पोशाखावरून तो कुठल्या तरी समारंभातून आला होता, असे वाटत होते.पहाटेच्या सुमारास नंतर एक पोलीस उपनिरीक्षकही तिथे आले. त्यांना घटनेनेचे गांभीर्य आणून दिले. हा प्रकार वेगळा दिसतोय, त्याला तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचे त्यांना सांगितले. त्या उपनिरीक्षकाचे म्हणणे होते, काय नाही साहेब त्याच्या नाकाचा घुना फुटला असेल. या अधिकाऱ्याचा निष्कर्ष कीव आणणारा होता. कारण त्याचे कपडे रक्ताने माखले होते. लिफ्टमधे रक्ताचा सडा पडला होता. पायऱ्यांवर रक्त पडले होते. एवढा प्रचंड रक्तस्त्राव पाहूनही त्या अधिकाऱ्याची अनास्था संताप आणणारी होती.पोलीस या घटनेविषयी बिलकुल गंभीर नव्हते. त्या परदेशी तरुणाच्या शरीरातून अगोदरचा मोठा रक्तस्त्राव झाला होता. त्यात त्याला पोलिसांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास रुग्णालयात नेले खरे, पण त्याच्यावर प्रत्यक्ष उपचाराला सकाळी १० वाजता सुरुवात करण्यात आली. म्हणजे रुग्णालयातही ठोस उपचाराविना तो सहा तास पडून होता. त्याचे येथे कोणीच नव्हते. त्यामुळे माणुसकीच्या आग्रहाखातर पोलिसांनी तत्काळ उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे आग्रह धरणे गरजेचे होते, पण तसे झाले नाही.त्याला रुग्णालयात दाखल करुन पोलीस आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले. जेव्हा सकाळी १० च्या सुमारास त्याला तपासायला घेतले तेव्हा कळले की त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला तातडीने मुंबईच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू नव्हता, तर भारतीय व्यवस्थेने केलेला खून आहे. स्वदेशी असो अथवा परदेशी येथे महत्वाचा नाही, मानवी जीव महत्वाचा आहे. त्याला वाचवण्यासाठी प्राधान्यक्रम असावा, पण दुर्दैवाने भारतीय व्यवस्थेला काहीही पडलेले नाही. रुग्णालय किंवा सरकारी व्यवस्थेविरुद्ध उद्रेकाची हीच अनास्था कारणीभूत आहे.
असो, दुःख इतकेच वाटते की पोलिसांवर विसंबून न राहता मी त्याचासोबत रुग्णालयात गेलो असतो तर डॉक्टरांवर उपचारासाठी दबाव आणू शकलो असतो. कदाचित तो आज जिवंत असता. या घटनाक्रमातील पोलिसांपासून डॉक्टरांपर्यंत प्रत्येक घटक आरोपी आहे, त्यांना शासन होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने पाठपुरावा करण्याचे निश्चित केले आहे.
दरम्यान, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून, सीसीटीव्ही चित्रफिती, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि वैद्यकीय अहवाल यांच्या आधारे मृत्यूचे नेमके कारण शोधले जात आहे. या घटनेमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
