“देशाची अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे” – राज्यपाल जिष्णुदेव वर्मा
अहिल्यानगर, दि. १५ : जगातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या युद्ध आणि संघर्षांचा परिणाम अन्नपुरवठा तसेच अर्थव्यवस्थेवर होत असल्यामुळे देशाची कृषी व्यवस्था अधिक सक्षम करणे अत्यंत आवश्यक आहे. देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि शाश्वत विकास यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित ३९ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा समारंभ पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांच्या हस्ते विज्ञान शाखेतील मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री व विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. अशोक कुमार सिंह, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे उपस्थित होते.
कृषी क्षेत्रात संशोधन व नवकल्पनांची गरज
राज्यपाल जिष्णुदेव वर्मा म्हणाले की, हवामान बदल, तांत्रिक प्रगती आणि बदलते जागतिक वातावरण यामुळे कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कृषी क्षेत्रात संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. नैसर्गिक तसेच शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला “जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान” हा संदेश कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी आहे. संशोधन आणि ज्ञानाच्या आधारे कृषी क्षेत्र अधिक सक्षम होऊ शकते.
विद्यापीठाचे उपक्रम उल्लेखनीय
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नैसर्गिक शेती व शाश्वत शेती पद्धतींच्या प्रसारासाठी तसेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी केलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे राज्यपालांनी सांगितले. विशेषतः शेतीत मानवरहित लघुविमान तंत्रज्ञानासाठी प्रशिक्षण देणारे केंद्र सुरू करणे हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे आवाहन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी विद्यापीठात होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत राज्यपाल म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधींकडे पाहू नये. कृषी क्षेत्रातील संशोधन, नवकल्पना आणि उद्योगनिर्मितीच्या संधींचा शोध घ्यावा. ग्रामीण विकास आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी राज्य शासन अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान
या पदवीप्रदान समारंभात विविध शाखांतील विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदव्या प्रदान करण्यात आल्या. कृषी संशोधन, तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकासाच्या दिशेने कार्य करणाऱ्या नव्या पिढीला या समारंभातून प्रेरणा मिळाल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
