“सुशीलकुमार शिंदे यांनी उभं केलेलं संघटन संपवण्याचं काम झालं” – मंत्री जयकुमार गोरे यांची प्रणिती शिंदे यांच्यावर टीका
सोलापूर महापालिका निवडणूक निकाल: भाजपला स्पष्ट बहुमत; महापौरपदावर भाजपचा दावा
सोलापूर, दि. २०: सोलापूर जिल्ह्याच्या महापालिका निवडणुकीत भाजपने निर्णायक यश मिळवत स्पष्ट बहुमताचा टप्पा पार केला आहे. एकूण १०२ जागांच्या सभागृहात भाजपने ८७ जागा जिंकल्या असून, सोलापूर महापालिकेत भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालात काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला असून, पक्षाला केवळ २ जागा मिळाल्या आहेत.
सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचे दोन खासदार असतानाही काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या स्थानिक कामगिरीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री व भाजप नेते जयकुमार गोरे यांनी काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मी काँग्रेसचा होतो हे सांगण्यासाठी कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नाही.”
तसंच त्यांनी पुढे म्हटलं की, “सुशीलकुमार शिंदे यांनी उभं केलेलं संघटन संपवण्याचं काम झालं. काँग्रेस कार्यकर्त्यांना गरज असताना त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलं.” भाजपच्या कामगिरीबाबत बोलताना त्यांनी निकाल स्वीकारण्याची गरज असल्याचं नमूद केलं. तसेच, “दोन नगरसेवक मिळाल्यानंतर समाधान वाटणं वेगळं आणि ८७ नगरसेवक मिळालेल्या पक्षावर टीका करणं वेगळं,” असंही ते म्हणाले.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जयकुमार गोरे यांनी सांगितलं की, भाजपचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेत कमळ फडकावण्याचं आहे. सांगोल्यातील राजकीय समीकरणांबाबत ते म्हणाले की, परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील.
स्वीकृत नगरसेवकांबाबत भाजपचा निर्णय
सोलापूर महापालिका निवडणुकीत पराभूत उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाणार नसल्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सांगितलं की, “पक्षासाठी दीर्घकाळ काम केलेले, त्याग केलेले आणि शहराच्या विकासाचा दूरदृष्टीने विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाईल.”
महापालिकेत भाजपला मिळालेल्या बहुमतामुळे सुमारे ९ स्वीकृत सदस्य नियुक्त होण्याची शक्यता आहे. या पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असली तरी, पक्षनिष्ठा आणि कामगिरीला प्राधान्य दिलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
