पुणे–पिंपरी चिंचवड महापालिका निकाल: भाजपची निर्णायक आघाडी; एकत्रित राष्ट्रवादीला मोठा फटका
पुणे, दि. १६: महानगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाने भक्कम आघाडी घेतली असून, निवडणुकीच्या तोंडावर एकत्र आलेल्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसल्याचे चित्र सध्या स्पष्ट झाले आहे. जोरदार प्रचार आणि मोठा बोलबाला करूनही पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालेले नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिका: भाजप बहुमताच्या पुढे
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ७४ जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता कायम राखण्याच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे. दुसरीकडे, अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रित राष्ट्रवादी आघाडीला सध्या ४१ जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे मतमोजणीच्या कलांवरून दिसत आहे.
पुणे महापालिका: भाजपची मोठी मुसंडी
पुणे महानगरपालिकेच्या १६५ जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत भाजपने निर्णायक आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार भाजप ९० जागांवर आघाडीवर आहे. पुणे महापालिकेत बहुमतासाठी ८२ जागांची आवश्यकता असून, भाजपने हा आकडा ओलांडत एकहाती सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
काँग्रेसचे खाते उघडले; प्रशांत जगताप विजयी
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला विरोध करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रशांत जगताप पुण्यात विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयामुळे पुणे महापालिकेत काँग्रेसने खाते उघडले आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार, काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाल्याचे समोर आले आहे.
प्रभाग क्रमांक १८-ड मधून प्रशांत जगताप यांनी अटीतटीच्या लढतीत सुमारे १,८०० मतांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवलेले अभिजीत शिवरकर यांचा पराभव केला. अभिजीत शिवरकर हे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र असून, ते ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले होते. दरम्यान, प्रशांत जगताप यांच्या आई रत्नप्रभा जगताप या त्यांच्या प्रभागात सध्या पिछाडीवर असल्याची माहिती आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये भाजपची आघाडी ठळकपणे दिसत असून, एकत्रित राष्ट्रवादी आघाडीला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही. मतमोजणी अंतिम टप्प्याकडे जात असताना दोन्ही शहरांतील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
