मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यास १ जानेवारी रोजी झाला प्रारंभ
नवी मुंबई, दि. २: नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचारी यांना महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यास १ जानेवारी रोजी प्रारंभ झाला असून वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृह येथे नेरुळ विभागात नियुक्त मतदान अधिका-यांना प्रशिक्षण देण्यात आले.
नेरुळ विभागात प्रभाग क्रमांक २१,२२,२३,२४ मध्ये प्रत्येक प्रभागात अ,ब,क,ड अशा चार जागांकरीता मतदान होत असून २८ ठिकाणी १८० मतदान केंद्रे आहेत. निवडणूक प्रक्रिया सुनियोजित पध्दतीने पार पाडण्यासाठी या मतदान केंद्रावर आवश्यक १ हजारहून अधिक अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचे एकत्रित पहिले प्रशिक्षण आज नेरुळ विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी मोहन नळदकर यांच्या नियंत्रणाखाली पार पडले.
मतदान व मतमोजणी कामकाजाच्या नोडल अधिकारी उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या माध्यमातून प्रशिक्षण विषयक सर्व बाबींची सुयोग्य व्यवस्था सहा.निवडणूक निर्णय अधिकारी संगीता पवार, सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अनुराधा बाबर, कार्यकारी अभियंता पंढरीनाथ चवडे यांच्या सहयोगाने करण्यात आली होती.
नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी नारायण पाईकराव यांनी उपस्थितांना निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, मतदान साहित्य तपासणी व वितरण, मतदार यादीचा वापर, मतदाराची ओळख पडताळणी, मॉकपोल प्रक्रिया, मतदान यंत्र सिलींग प्रक्रिया, कायदेशीर बाबी अशा निवडणूकीशी संबंधित विविध बाबींची माहिती देण्यात येणार असून विविध शंकांचे निरसनही केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ईव्हीएम मशीनच्या प्रत्यक्ष हाताळणीचे प्रात्यक्षिक सिडकोचे सहा.कार्यकारी अभियंता दिपक कुमावत यांनी दिले. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष व अधिका-यांना निवडणूक विषयक माहिती पुस्तिका देण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वीच 6 हजाराहून अधिक कर्मचा-यांची निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली असून निवडणूक विषयक कामकाजाचे आदेश संबधितांना देण्यात आले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेस कोकण विभागीय आयुक्तालयामार्फत रायगड जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, निवडणूक विषयक कामकाजातील मनुष्यबळ व्यवस्थापनाची जबाबदारी असणा-या प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्यामार्फत सर्व संबधितांना नियुक्तीचे व प्रशिक्षणाचे आदेश निर्गमित करण्यात आले होते.
या कर्मचा-यांची आठही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या विभागांमध्ये नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार आज आदेश मिळूनही जे अधिकारी, कर्मचारी सदर प्रशिक्षणास अनुपस्थित होते त्यांना नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तरी संबधित गैरहजर कर्मचा-यांनी त्वरीत आपल्या निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयात उपस्थित व्हावे असे सूचित करण्यात येत आहे.
यापुढील प्रशिक्षण उद्या दि. २ जानेवारी रोजी विष्णुदास भावे नाटयगृह वाशी येथे, सकाळी १० वाजता, बेलापूर विभागात निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त कर्मचा-यांचे होत आहे याची संबधितांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.
