“शिवसेना सोडण्याचा निर्णय आपण वेदनेतून घेतला आहे” – तेजस्वी घोसाळकर
मुंबई, दि. १५: शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका व शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या सुश्ना तेजस्वी घोसाळकर यांनी आज मुंबई भाजप अध्यक्ष आ. अमित साटम यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या पक्षांतराची कुजबुज मुंबईच्या राजकीय क्षेत्रात ऐकायला येत होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश हा शिवसेना ठाकरे गटासाठी धक्का नक्कीच नाहीये. फेब्रुवारी २०२४ मध्ये तेजस्वी घोसाळकर यांचे पती व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा खून झाला होता. या प्रकरणाचा तपास सध्या केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चालू असून बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे.
पक्षाला रामराम करण्यापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी फेसबूक वर एक निवेदन प्रसारित केलं. ज्यात शिवसेना सोडण्याचा निर्णय आपण वेदनेतून घेतला असल्याचा उल्लेख केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची मुंबई बँकेच्या संचालक पदी नेमणूक करण्यात आली होती. आजच्या भाजप प्रवेशावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची उपस्थिती खूप काही बोलून जाते.
