नवी मुंबईतील नागरिक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्त सहभागामुळे प्लास्टिक रिसायक्लोथॉन उपक्रमात ४६६ किलो प्लास्टिक संकलन
नवी मुंबई, दि. ४: प्लास्टिकमुक्त नवी मुंबई ही संकल्पना नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रोजेक्ट नवी मुंबई संस्थेच्या सहयोगाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्लास्टिक वापराला प्रतिबंधाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत असून प्लास्टिक पिशव्या व एकल वापराच्या प्लास्टिकला प्रतिबंध म्हणून तपासणी केली जात आहे व प्लास्टिकचा वापर आढळल्यास दंडात्मक रक्कम आकारणी केली जात आहे तसेच प्लास्टिक साठाही जप्त केला जात आहे. त्याचप्रमाणे याविषयी नानाविध उपक्रम राबविले जात असून असाच एक ‘प्लास्टिक रिसायक्लोथॉन’ हा अभिनव उपक्रम नमुंमपा व प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, माईन्ड स्पेस आरईआयटी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे राबविण्यात आला. महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संस्था यांच्याकडून या उपक्रमाला उत्साही सहभाग लाभला. या उपक्रमांतर्गत नवी मुंबई शहरातून ४६६ कि.ग्रॅ. प्लास्टिक कच-याचे संकलन करण्यात आले. या माध्यमातून लोकसहभागाव्दीरे पर्यावरण संवर्धनाकडे एक यशस्वी पाऊल उचलण्यात आले.
या मोहिमेमध्ये नमुंमपा क्रमांक ९२ कुकशेत, शाळा क्रमांक १६ शिवाजीनगर, शाळा क्र. ०२ व ११७ दिवाळे, शाळा क्र. ४६ गोठीवली, शाळा क्र. ७६ घणसोली तसेच एमईएस विद्यामंदिर बेलापूर, शेतकरी शिक्षण संस्थेचे इंग्रजी विद्यालय घणसोली, विद्याभवन शाळा नेरूळ आदी शैक्षणिक संस्थांनी उत्साहाने सक्रिय सहभाग नोंदविला.
यासोबतच मँगो गार्डन बेलापूर, बीआरएससीसीएल बेलापूर, मानराव चॅरिटेबल ट्रस्ट वाशी, कलश उद्यान कोपरखैरणे, ग्रीन वर्ल्ड दिघा, पिरॅमिड एलिमेंट्स दिघा अशा विविध सोसायट्या आणि संस्था व नागरिकांनी या मोहीमेत उत्साहाने सहभाग नोंदवला.
या उपक्रमांत्रगत संकलित प्लास्टिकवर प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या माध्यमातून पुनर्प्रक्रिया (रिसायकलींग) करण्यात येणार असून माइंडस्पेसच्या सीएसआर निधीच्या सहाय्याने प्लास्टिकपासून बेंच, पेन, शर्ट आणि इतर उपयुक्त वस्तू तयार केल्या जाणार आहेत. छोट्या कृतींमधून मोठा बदल साधता येतो याचे हा उपक्रम एक उत्तम उदाहरण आहे.
या मोहिमेदरम्यान अनेक प्रेरणादायी क्षण अनुभवास आले. लहान मुलांनी उत्साहाने स्वयंस्फुर्तीने प्लास्टिक जमा. या सोबतच सोसायट्या, संस्थांचे प्रतिनिधी व नागरिकांनी महापालिका राबवत असलेल्या अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांमध्ये लोकसहभागावर भर द्यावा असे सूचित केले असून त्याची प्रचिती या प्लास्टिक रिसायक्लोथॉन उपक्रमात मोठया संख्येने नागरिकांनी सहभागी घेत दाखविली. रिसायकलिंगबाबत नागरिकांनी व त्यातही विशेषत्वाने विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या जागरुक सहयोगाबद्दल अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले. यापुढील काळात अधिकाधिक नागरिक, संस्था आणि विद्यार्थी यांना अशा उपक्रमांमध्ये सहभागी करुन घेत स्वच्छ, सुंदर, प्लास्टिकमुक्त, हरित नवी मुंबई घडविण्याच्या दिशेने गतीमान व जबाबदार पावले टाकली जात आहेत.
