लोकशाही, मानवाधिकार आणि नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची घेतली दखल
ओस्लो (नॉर्वे): व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरीना मच्याडो यांना २०२५ सालचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकशाही, मानवाधिकार आणि नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाची ही आंतरराष्ट्रीय दखल मानली जात आहे.
मच्याडो यांनी गेल्या अनेक वर्षांपासून व्हेनेझुएलामध्ये हुकूमशाहीविरुद्ध लढा दिला असून, देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी प्रयत्न केले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून माध्यमांवर आणि विरोधकांवर होत असलेल्या दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे.
सध्याच्या काळात जगभरात लोकशाही संस्थांवर दबाव वाढत असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि निष्पक्ष निवडणुकांच्या संकल्पनेवर गदा येत आहे. वाढती हुकूमशाही प्रवृत्ती, माध्यमांचे दमन आणि विरोधकांना तुरुंगात डांबणे ही प्रवृत्ती अनेक देशांत दिसून येत आहे.
२०२४ मध्ये इतिहासात सर्वाधिक निवडणुका घेण्यात आल्या, परंतु त्यापैकी अनेक निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष राहिल्या नाहीत, अशी चिंता आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मच्याडो यांच्या संघर्षाला आणि त्यांच्या शांततापूर्ण प्रयत्नांना नोबेल समितीने सन्मानित केले आहे.
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरीरत्या आपल्यालाच यंदाचे शांततेचे नोबेल पारितोषिक मिळायला हवे अशी अपेक्षा अनेकवेळा व्यक्त केली. यासाठी त्यांनी कधी आपण भारत-पाकिस्तान तर कधी रशिया-युक्रेन थांबवण्यासाठी यशस्वी मध्यस्ती केल्याचा दावा केला. नुकतेच गाझा मध्ये शांतता स्थापित करण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले ज्याची नोबेल शांतता समितीकडून दखल घेतली जाईल अशी ट्रम्प यांना अशा होती जी आता मावळली आहे.
