श्रावणी सोमवार निमित्त नवी मुंबईतील शिव मंदिरांमध्ये हिवताप/डेंग्यूबाबत जनजागृती
नवी मुंबई, दि. ५: श्रावण महिना हा सण – उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यात मोठया प्रमाणावर व्रतवैकल्ये केली जातात. विशेषत्वाने श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवमंदिरांमध्ये नागरिकांची मोठया प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवमंदिरांमध्ये आरोग्यविषयक शिबीरे आयोजित केल्यास नागरिकांमध्ये मोठया प्रमाणावर जनजागृती होईल हे लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका क्षेत्रातील १७ शिवमंदिरांमध्ये हिवताप, डेंग्यू व साथीच्या आजारांबाबत माहिती व उपाययोजना देणारी आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली होती.
या १७ ठिकाणी ८४१९ नागरिकांनी भेट देऊन प्रात्यक्षिकांसह माहिती जाणून घेतली. तसेच १८५ नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
नवी मुंबईकर नागरिकांनी आरोग्य विभागामार्फत करण्यात येणा-या डास प्रतिबंधात्मक व जनजागृती कार्यवाहीसोबतच आपल्या घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणेबाबत जागरुकता दाखवली तर नवी मुंबई शहरात हिवताप/डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल. तरी त्यादृष्टीने नागरिकांनी याविषयी जागरुक राहून सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
