हिंदी भाषा सक्ती विरोधात शासन निर्णयाची होळी ते दोन्ही शासन निर्णय रद्द; जाणून घ्या नेमकं दिवस भरात काय काय घडलं
मुंबई, दि. २९: आज मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था यांच्या वतीने प्राथमिक शिक्षणातील तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी आणि जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त एकत्र येत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दिपक पवार, मनसेचे नेते नितीन सरदेसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी एकत्र येत हिंदी(तृतीय भाषा) सक्तीबाबतच्या शासन निर्णयाची होळी केली. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे राज्यभर हिंदी भाषा सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्याचा कार्यक्रम हि राबविण्यात आला.
या नंतर काही तासातच राज्य सरकारने तृतीय भाषा संदर्भातील काढण्यात आलेले राज्य सरकारचे १६ एप्रिल २०२५ आणि १७ जून २०२५ रोजीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. उद्या पासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
