जून महिन्याच्या २० दिवसात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये नवी मुंबईत दंडापोटी १ लाख ४० हजार रक्कम वसूल
नवी मुंबई, दि. २४: नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त व्हावे यादृष्टीने जनजागृती प्रमाणेच प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधी तपासणी मोहीमा नियमितपणे करुन एकल वापर प्लास्टिकचा उपयोग थांबवावा याकरिता ठोस प्रयत्न केले जात आहेत. याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग कार्यालयांमध्ये प्लास्टिक विरोधी पथके कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे परिमंडळ निहाय २ पथकेही स्वतंत्ररित्या कार्यरत आहेत.
या पथकांमार्फत नियमित कारवाई केली जात असून १ जून पासून २० जून पर्यंत एकल वापर प्लास्टिक आढळलेल्या २७ दुकाने व आस्थापने यांच्यावर कारवाई करत १ लाख 40 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. तसेच २१४ किलो ७०० ग्रॅम इतक्या वजनाच्या प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
यामध्ये बेलापूर विभागात एका दुकानदाराकडून ५००० इतकी दंडात्मक रक्कम तसेच १ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. नेरुळ विभागातही एका व्यापा-याकडे एकल प्लास्टिकचा वापर आढळल्याने १.५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे व ५,००० दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. वाशी विभागात २ दुकानदारांकडून २ किलो प्लास्टिक मालाची जप्ती करीत १०,००० दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. अशाचप्रकारे कोपरखैरणे विभागात ४ दुकानदारांकडून २०,००० इतका दंड वसूल करित १२९ किलो इतक्या मोठया प्रमाणात एकल वापर प्लास्टिक माल जप्त करण्यात आला आहे. घणसोली विभागात २ दुकानदारांकडून १०,००० दंड वसूली व ६ किलो प्लास्टिक माल जप्ती तसेच दिघा विभागात एका दुकानदाराकडून ५,००० दंडात्मक रक्कम वूसल करित ३ ग्रॅम प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
परिमंडळ १ च्या भरारी पथकामार्फत ३ व्यवसायिकांकडून १५,००० दंडात्मक वसूली व १ किलो ८०० ग्रॅम प्लास्टिक पिशव्या तसेच परिमंडळ २ च्या भरारी पथकामार्फत १३ दुकानदारांकडून ७०,००० इतकी मोठया प्रमाणात दंड वसूली व ७३ किलो १०० ग्रॅम एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या निर्देशानुसार परिमंडळ १ चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. अजय गडदे तसेच परिमंडळ २ चे उपआयुक्त संजय शिंदे व स्मिता काळे यांच्या नियंत्रणाखाली मागील २० दिवसात राबविलेल्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये एकूण २७ व्यावसायिकांकडून १ लाख ४० हजार दंडात्मक रक्कमेची वसूली करण्यात आलेली आहे आणि २१४ किलो ७०० ग्रॅम एकूण प्लास्टिक माल जप्त केला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने अशा प्रकारच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा सातत्याने राबविल्या जाणार असून नागरिकांनी आपले नवी मुंबई शहर प्लास्टिक मुक्त होण्याकरिता प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिकचा दैनंदिन जीवनात केला जाणारा उपयोग पूर्णपणे थांबवावा व कापडी पिशव्यांचा पर्याय वापरावा असे आवाहन करण्यात येत आहे.
