या दिवशी एएसआय स्मारकांमध्ये प्रवेश शुल्क माफ
मुंबई, दि. २०: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून २०२५ रोजी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे (एएसआय )आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने ८१ केंद्र संरक्षित स्मारकांमध्ये योग सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. या उत्सवाचा एक भाग म्हणून या दिवशी सर्व एएसआय स्मारकांमध्ये जनतेसाठी प्रवेश मोफत असेल.
या वर्षीच्या ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पनेशी निगडित असलेल्या या भव्य योग महोत्सवाचे उद्दिष्ट भारताचा सांस्कृतिक वारसा आणि प्राचीन आरोग्य पद्धतींमधील कालातीत संबंधांना प्रोत्साहन देणे असे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२५ मध्ये त्यांच्या ‘मन की बात’ भाषणात जाहीर केलेली ही संकल्पना केवळ स्वतःशीच नव्हे तर पर्यावरणाशीदेखील सुसंवाद वाढविण्यातील योगाची भूमिका अधोरेखित करते.
पुराना किल्ला (दिल्ली), गोल गुंबज (कर्नाटक), कोणार्क सूर्य मंदिर (ओडिशा), चित्तोडगड किल्ला (राजस्थान), एलिफंटा लेणी (महाराष्ट्र) आणि एएसआय अंतर्गत येणाऱ्या इतर 76 ऐतिहासिक स्थळांवर हजारो सहभागी योगाभ्यास करण्यासाठी एकत्र येतील. ही सत्रे योग तत्वज्ञानात खोलवर रुजलेल्या समग्र आरोग्य आणि पर्यावरणीय जाणीवेचे महत्त्व अधोरेखित करतील.

या उत्सवात गृहमंत्री अमित शाह अहमदाबाद येथील अडालज वाव येथे;; वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल मुंबईतील कान्हेरी गुंफा येथे; ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी पट्टडकल येथील मंदिर समूहात आणि इतर मान्यवर विविध ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. संपूर्ण भारतात जिथे योग उत्सव आयोजित केले जात आहेत तिथे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

योग ही भारताने जगाला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक आहे आणि त्याचे महत्त्व ओळखून संयुक्त राष्ट्रांनी २०१४ मध्ये महासभेच्या अधिवेशनात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला.
(टीप: हे फोटो गेल्या वर्षीच्या एएसआय स्मारकांमधील समारंभाचे आहेत)
