आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ मदतकार्यासाठी विशेष दलाची रचना
नवी मुंबई, दि. २८: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आपत्ती निवारणासाठी विभागवार यंत्रणा असून यामध्ये महानगरपालिकेचे अग्निशमन दल महत्वाची भूमिका बजावते. त्या कार्यवाहीत अधिक सक्षमता येण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद पथक तसेच ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती प्रतिसाद पथक (TDRF) या धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिकेने आपत्कालीन प्रतिसाद दल (DRF – Disaster Response Force) स्थापन केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागातील प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी तसेच नागरी संरक्षण दलामधील अधिकारी यांचा समावेश असणारे हे स्वतंत्र आपत्कालीन प्रतिसाद दल (DRF) यापुढील काळात नवी मुंबईतील आपत्ती निवारणासाठी सज्ज असणार आहे.
नवी मुंबई शहराच्या भौगोलिक व्याप्तीमध्ये डोंगरावरील वस्ती, खाडी किनारा, तलावे, जुनी बांधकामे, शहरातून जाणारे राज्य व राष्ट्रीय महामार्ग इत्यादी बाबींचा विचार करता नवी मुंबई शहरामध्ये कोणतीही आपत्ती उदा. अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पाणी तुंबणे, वृक्ष व वृक्षांच्या फांद्या पडणे, इमारत ढासळणे, निवासी व व्यापारी मालमत्तांमध्ये पाणी शिरणे, दरड कोसळणे, भूस्खलन (Land Slide) अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. अशाप्रकारे नवी मुंबई शहरामध्ये कोणतीही नैसर्गिक अथवा मानव निर्मित आपत्ती घडल्यास अग्निशमन दलास पाचारण केले जाते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन अग्निशमन विभागातील प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी आणि नागरी संरक्षण दलामधील अधिकारी यांचा समावेश असणारे स्वतंत्र आपत्कालीन प्रतिसाद दल (DRF) स्थापना करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरिता आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी परिमंडळ-१ व परिमंडळ-२ अंतर्गत परिमंडळनिहाय आपत्कालीन प्रतिसाद दल (DRF) स्थापित करण्यात आलेले असून हे दल उपआयुक्त (आपत्ती व्यवस्थापन) यांचे देखरेख व नियंत्रणाखाली कार्यरत राहतील. सहा.अग्निशमन केंद्र अधिकारी श्री.प्रेमानंद ठाकूर हे परिमंडळ १ आपत्कालीन प्रतिसाद दलाचे तसेच सहा.अग्निशमन केंद्र अधिकारी पदाजी निरगुडे हे परिमंडळ २ आपत्कालीन प्रतिसाद दलाचे नियंत्रण अधिकारी असणार असून त्यांच्या नियंत्रणाखाली विभागीय क्षेत्ररक्षक, अग्निशमन प्रणेता, अग्निशामक अशी ११ जणांचा प्रशिक्षित समुह मदतकार्यासाठी दक्षतेने कार्यरत असणार आहे.
हे आपत्कालीन प्रतिसाद दल (DRF) नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ X ७ कार्यरत असणार आहे. आपत्ती किंवा दुर्घटनेचे स्वरुप मोठे असल्यास दलामधील सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्रित काम करतील. नियंत्रण कक्षामधून आपत्तीबाबत माहिती मिळाल्यानंतर दलामार्फत त्या ठिकाणी आपत्ती निवारणासाठीच्या तात्काळ उपाययोजना करण्यात येतील. दलाकडे आवश्यक वाहने व साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात येईल. या अनुषंगाने नमुंमपा अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी यांचेमार्फत आपत्कालीन प्रतिसाद दलांमधील अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक वाहने तसेच लाईफ जॅकेट्स, कटींग टूल्स (स्प्रेडर कटर कॉम्बी टूल्स इत्यादी), काँक्रीट कटर, पॉवर हॅमर, लेंडर, फायर एक्स्टिंग्युशर अशी तसेच इतर आवश्यक असणारी साधन सामग्री उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
या आपत्कालीन प्रतिसाद दलामुळे (DRF) नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सक्षम होणार असून कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेत तात्काळ मदतकार्य सुरू करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे या दलामध्ये अग्निशमन दलातील प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी असल्याने तसेच त्यांना नागरी संरक्षण दलाची साथ असल्याने मदतकार्य सक्षमतेने होणार आहे. त्याचप्रमाणे परिमंडळनिहाय दोन स्वतंत्र समुह कार्यान्वित करण्यात आल्याने जलद मदतकार्य करणे शक्य होणार आहे. तरी नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या मदतकार्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी 27567060/7061 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 1800222309/1800222310 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
