भारतीय सुरक्षा दलांकडून जशास तसे उत्तर
नवी दिल्ली, दि. ९: पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर आज पुन्हा एकदा आगळीक करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील जैसलमेर, बारामुल्ला, फिरोझपूर, फझील्का, कुआरबेट, भुज, बारमेर, लाखी नाला, लालगड जट्टा, अवंतीपूरा हवाई तळ, उरी, जम्मू, श्रीनगर, सांबा, पठाणकोट, राजस्थानातील पोखरण यासह एकूण २६ ठिकाणी पाकिस्तानातर्फे ड्रोन हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. नागरी ठिकाणांवर घिरट्या मारणाऱ्या या ड्रोनवर भारतीय सुरक्षा दलांनी तात्काळ कारवाई करत इंटरसेप्टर क्षेपणास्त्र सोडली. ज्यात हे ड्रोन निष्क्रिय झाले.
दरम्यान, फिरोजपूर येथील नागरी वस्तीवर ड्रोन हल्ला झाला असून यात एका स्थानिक परिवारातील सदस्य जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात राज्यातील कच्छ येथे संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आला आहे. सायंकाळच्या दरम्यान उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू झाला असून त्याला भारताकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नौगाम हंदवाडा सेक्टरमध्येही पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तान्यांनी पूंछ आणि कुपवाडा सेक्टरमध्येही सीमेपलीकडून गोळीबार केला तसेच सीमेपलीकडून ड्रोन डागण्यात आले आहेत. सध्या संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
https://x.com/SpokespersonMoD/status/1920914711601967166
