७६व्या प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर संपन्न
नवी दिल्ली, दि. २६: ७६वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र उत्साहाने देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे. नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिरंगा ध्वज फडकावला. देशाच्या सामरिक सज्जतेचं, आणि सांस्कृतिक परंपरेचं समृद्ध दर्शन घडवणाऱ्या संचलनाची मानवंदना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारली. देशाची तीनही सेनादलं, सीमासुरक्षा तसंच तटरक्षक दल, सशस्त्र पोलीस दलं, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, गृहरक्षक दल अशी अनेक पथकं संचलनात सहभागी झाली होती. देशाची विविधता आणि सांस्कृतिक एकात्मता दाखवणारे १६ विविध राज्यांचे तसंच इतर मंत्रालयांचे चित्ररथही संचलनात सहभागी झाले होते. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियंतो या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंडोनेशियाच्या सेनादलांचं ३५२ जणांचं पथकही संचलनात सहभागी झालं होतं.
या सोहळ्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनेचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले. सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्यांमधे, सरकारी, निमसरकारी कार्यालयं, स्थानिक स्वराज्य संस्था, तसंच शाळा महाविद्यालयं, सामाजिक संस्था संघटना आणि गृहसंकुलांमधेही ध्वजवंदनेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होेते.
Source – AIR
