माजी पंतप्रधान व जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग याचं वृद्धापकाळाने निधन
नवी दिल्ली, दि. २७: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं काल नवी दिल्ली येथे वृध्दापकाळाने निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. काल संध्याकाळी प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
२६ सप्टेंबर १९३२ रोजी फाळणीपूर्व भारताच्या पंजाब प्रांतातल्या एका गावात जन्मलेल्या, डॉ. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ या काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या यूपीए सरकारमध्ये सलग दोन वेळा प्रधानमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला.
ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवल्यावर मनमोहन सिंग यांनी काही काळ संयुक्त राष्ट्रांसाठी काम केलं. १९७१ मध्ये, ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. त्यांनी अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार आणि सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, प्रधानमंत्र्याचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं. डॉ. मनमोहन सिंग यांनी १९९१ आणि १९९६ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केलं, आणि आर्थिक सुधारणांचं व्यापक धोरण आखलं.
तत्कालीन प्रधानमंत्री पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले डॉ. सिंग यांना १९९१ मधल्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार समजलं जातं, ज्याने आर्थिक उदारीकरणाच्या युगाची सुरुवात झाली. डॉ. सिंग १९९१ ते २०२४ या काळात राज्यसभेचे सदस्य होते. ३३ वर्षांच्या सेवेनंतर ते यंदाच्या एप्रिलमध्ये राज्यसभेतून निवृत्त झाले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, माहितीचा अधिकार कायदा आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा, हे डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या प्रधानमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेले महत्वाचे निर्णय होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज नवी दिल्ली इथं संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल सरकारनं ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
Source – AIR
