“नव्या सरकारमध्येही एकसंधपणे काम करू” – महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
मुंबई, दि. ०४: देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाल्यावर महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची माहिती दिली. महायुतीत आतापर्यंत सर्व निर्णय एकत्रितपणे घेतले गेले असून यापुढेही एकत्र राहून निर्णय घेऊ असं भाजपा विधिमंडळ गट नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा उल्लेख करत फडणवीस यांनी जनतेचे तसंच भाजपा नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे आभार मानले. नवं सरकार राज्याच्या प्रगतीसाठी काम करेल असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवले असून नव्या सरकारमध्येही एकसंधपणे काम करू असं शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी, तसंच विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले.
Source – AIR
