नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली व बेलापूर मतदारसंघातील विविध समाज घटकांमध्ये मतदार जनजागृती मोहीम
नवी मुंबई, दि. ०६: विधानसभा निवडणूकीच्या स्वीप उपक्रमांतर्गत जनजागृतीवर भर देण्यात येत असून १५० ऐरोली व १५१ बेलापूर विधानसभा निवडणूक कार्यालयांप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त तथा दोन्ही मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक पातळीवर विविध समाज घटकांपर्यंत पोहचविणे जनजागृती करण्यात येत आहे.
या अंतर्गत आज विविध ठिकाणी नाका कामगारांशी संवाद साधून त्यांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. त्याचप्रमाणे २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये १५० ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या स्वीप नोडल अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वीपचे अधिकारी, कर्मचारी यांनी रबाळे आणि तळवली नाका तसेच सेक्टर ४ ऐरोली येथील नाक्यांवरील नाका कामगारांची भेट घेत त्यांच्यामध्ये मतदान करण्याविषयी जागरुकता निर्माण केली. अशाच प्रकारे ऐरोली विभागात चिंचपाडा व गणेशनगर येथील रहिवाशांना मतदानाचा भारतीय संविधानाने दिलेला अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी नमुंमपा शाळा क्रमांक ५३ चिंचपाडा येथे नागरिकांना एकत्र करुन सामुहिकरित्या मतदार प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त स्वीप नोडल अधिकारी उपआयुक्त संतोष वारुळे व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नवी मुंबईतील विविध समाज घटकांशी संपर्क साधून २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे व या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढविण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.
