महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाविकास आघाडीचा मुंबईत मेळावा
मुंबई, दि. १६: महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुरू आहे. निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी तयार असून ही महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई असल्याचं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Shivsena UBT) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित करताना केलं.
शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, माझा त्याला पाठिंबा आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. या निवडणुकीत ईव्हीएम आणि त्याच्याशी संबंधित संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष द्या, असं कार्यकर्त्यांना आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे कार्यकर्ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसला पूर्ण सहकार्य करतील, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील, असं आश्वासन त्यांनी दिलं.
राज्यात जागावाटपाची घोषणा लवकरात लवकर करावी, जेणेकरून सर्वांना कामाला लागता येईल, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडलं. राज्यात १०० टक्के महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा विश्वास खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. भाजपाचा उद्देश राज्यघटना आणि लोकशाहीवर आघात करण्याचा आहे, हे लक्षात ठेवून कार्यकर्त्यांनी काम करावं, हे बेकायदा सरकार जनतेला उलथवून लावायचं आहे, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. कायदेशीर पद्धतीनं स्थापन झालेलं सरकार उलथवून महायुतीनं राज्यघटनेचा आणि डॉ. आंबेडकरांचा अपमान केला आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याला एकजुटीनं काम करावं लागेल, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
